Jewellery Theft (Pudhari Photo)
अहिल्यानगर

Ahilyanagar Jewellery Theft Case: अहिल्यानगर सावेडीतील सराफ दुकानात 2 लाखांचे सोन्याचे गंठण चोरी

चार जणांच्या टोळीने हातचलाखी करून केली चोरी; सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद

पुढारी वृत्तसेवा

नगर: सावेडी परिसरातील नामांकित ‌’चंदुकाका सराफ प्रा. लि.‌’ या सराफी पेढीत एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन महिला व एक पुरुष अशा चार जणांच्या टोळीने सेल्समनची नजर चुकवून 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले. ही घटना 12 मे रोजी दुपारी घडली. हा प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुहास बाहुबली भोसेकर (रा. जैनवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, ह.मु. कृष्णगंगा रेसिडेन्सी, सावेडी, अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी सावेडी येथील अपेक्स हॉस्पिटल शेजारी असलेल्या चंदुकाका सराफ प्रा. लि. शोरूममध्ये असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

12 मे 2026 रोजी दुपारी शोरूममध्ये 3 महिला व 1 पुरुष ग्राहक म्हणून आले. त्यांनी काउंटरवर असलेल्या सेल्समनकडे सोन्याचे पट्टीचे शॉर्ट गंठण दाखवण्याची विनंती केली. सेल्समनने त्यांना डिझाईन्स दाखवले, परंतु ते पसंत न आल्याने सेल्सपर्सनने कपाटातील दुसऱ्या डब्यातील शॉर्ट गंठण काढून त्यांना दाखवले.

तेही डिझाईन्स पसंत पडले नसल्याचे सांगून या चारही ग्राहकांनी काहीही खरेदी न करता शोरूममधून काढता पाय घेतला. सेल्सपर्सन राजश्री गावडे यांनी काउंटरवरील दागिने पुन्हा डब्यात व्यवस्थित ठेवताना त्यांना सोन्याचे एक शॉर्ट गंठण कमी असल्याचे जाणवले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी उघड

शोरूममध्ये शोध घेऊनही दागिना न सापडल्याने मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये दुपारी त्यावेळेत आलेल्या ग्राहकांपैकी आकाशी रंगाची साडी नेसलेल्या एका महिला ग्राहकाने अत्यंत हुशारीने हातचालाखी केली. तिने काउंटरवरील सोन्याचे दोन लाख रुपयांचे मिनी गंठण हळूच उचलून पुढील टेबलावर ठेवलेल्या तिच्या साडीच्या घडीमध्ये लपवून चोरल्याचे स्पष्ट दिसले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी 3 महिला व एक पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT