नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर येथील विद्यालयातील दहावी परीक्षा केंद्रात परिसरातील पाच विद्यालयाचे विद्यार्थी येतात. परीक्षा काळात विद्यालय परिसरात तसेच रस्त्यावर टपोरी पोरांचा मोठा घोळका पाहावयास मिळत होता. बुधवारी (दि.18) एमआयडीसी पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे टपोरींची पळता भोई थोडी झाली.
पोलिसांच्या या कार्याचे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांमधून कौतुक करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी, विद्यालयांमध्ये दहावीची परीक्षा देण्यासाठी 459 परिक्षार्थी बसलेले होते. पेपर सुरू होण्याच्या वेळेस तसेच पेपर सुटल्यानंतर विद्यालय परिसर व रस्त्यांवर टपोरी मुलांचा मोठा घोळका पहावयास मिळत होता.
तसेच धूम स्टाईल दुचाकी चालवणे, विद्यार्थिनींना कट मारणे, अश्लील हावभाव करणे असले प्रकार देखील घडत होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दहावीचा शेवटचा पेपर असल्याने एमआयडीसी पोलिसांनी अचानकपणे परिसरात गस्त घालून टपोरी पोरांना चांगलाच प्रसाद दिला. पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे पाहून टपोरींना पळता भुई थोडी झाली होती.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज मोंढे, सहाय्यक फौजदार मोहम्मद शेख, हवालदार आदिनाथ आव्हाड, कॉन्स्टेबल जयसिंग शिंदे यांनी विद्यालय परिसर व रस्त्यावर येणाऱ्या टपोरींचा चांगलाच समाचार घेतला. यामुळे विविध चौकात घोंगावणारी टपोरींची गँग रस्ता मिळेल तिकडे पळत होती. पोलिसांच्या या भूमिकेचे ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमधून कौतुक करण्यात आले.
ग्रामीण विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोकळ्या वातावरणात शिक्षण घेता येणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींनीही न घाबरता समोर येण्याची गरज आहे. अथवा पोलिसांशी संपर्क साधावा. विद्यालय परिसरामध्ये टपोरी, रोडरोमिओ यांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक भूमिका घेतली जाईल.मनोज मोंढे, पोलिस उपनिरीक्षक