Jamkhed Municipal Election Results Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Municipal Election Results: जामखेड नगरपरिषद निकाल; राम शिंदेंचे निर्विवाद नेतृत्व, भाजपचा दणदणीत विजय

नगराध्यक्षपदासह 15 जागांवर भाजपचा कौल; विरोधकांसाठी नव्या रणनीतीची गरज

पुढारी वृत्तसेवा

दीपक देवमाने

जामखेड नगरपरिषद निवडणूक निकालातून सभापती विधानपरिषद प्रा. राम शिंदे यांचे निर्विवाद नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नगराध्यक्षपदासह 15 जागांवर विजय मिळवत भाजपाने केवळ सत्ता मिळवली नसून, विरोधकांच्या राजकीय ताकदीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी 3682 मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्याने भाजपने आपली ताकद दाखवली आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता प्रा. राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार अशी प्रतिष्ठेची लढाई बनली होती. दोन्ही नेत्यांनी पूर्ण ताकद लावली असताना भाजपाने मिळवलेला स्पष्ट कौल हा संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांचे जाळे आणि प्रा. शिंदेंचा वैयक्तिक जनसंपर्क यांचा परिणाम मानला जात आहे.

यामध्ये नगराध्यक्षपदाचा निकाल निर्णायक ठरला असून

नगराध्यक्षपदासाठी प्रांजल अमित चिंतामणी यांनी तब्बल 3682 मतांची विजय मिळवणे, हा केवळ व्यक्तिगत विजय नसून भाजपाच्या धोरणात्मक यशाचे प्रतीक आहे. सुशिक्षित, शांत, संयमी महिला नेतृत्वाला संधी देत भाजपाने मतदारांमध्ये सकारात्मक संदेश दिला, तर प्रचारात विकासकामे, स्थैर्य आणि अनुभवी नेतृत्व यावर भर देण्यात आला.

भाजपासाठी आगामी राजकारणाचा आत्मविश्वास

या निकालामुळे भाजपाला आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांसाठी आत्मविश्वासाचे बळ मिळाले आहे. प्रा. राम शिंदेंचे नेतृत्व जामखेड तालुक्यात अजूनही मजबूत असल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपाने हा कौल ‌‘नेतृत्वावरचा विश्वास‌’ म्हणून मांडण्याची तयारी सुरू केली आहे. एकूणच, जामखेड नगरपरिषद निवडणूक निकाल हा स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरला असून, भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी विरोधकांना आता नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

राष्ट्रवादीतील मतविभागणीचा फटका?

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस वेगवेगळे लढल्याने मतांचे विभाजन झाले. याचा थेट फायदा भाजपाला झाला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाला देखील पराभव चाखण्याची वेळ आली. त्यामुळे राजकीय समीकरणे काही ठिकाणी चुकीचे ठरल्याचा फटका देखील शरद पवार पक्षाला बसला आहे. नगरसेवक पदाच्या पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपेक्षित प्रभाव पाडण्यात आमदार रोहित पवार यांना यश आले नाही, हे निकालातून स्पष्ट होते.

वंचित बहुजन आघाडीची उपस्थिती लक्षवेधी

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते असलेले ॲड अरुण जाधव व भालेराव संगीता या प्रभाग 6 मधून दोन्ही वंचित बहुजन आघाडीने दोन जागांवर विजय मिळवत शहरी दलित-वंचित मतदारांमध्ये आपली उपस्थिती अधोरेखित केली आहे. भविष्यातील निवडणुकांत ही ताकद निर्णायक ठरू शकते, याचे संकेत या निकालातून मिळतात.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार: प्रा राम शिंदे

शहरवासीयांनी जो विश्वास भाजपवर टाकला आहे त्या विश्वासाच्या जोरावर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये जे आश्वासन दिले आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे जामखेडकरांनी दिलेल्या भरभरून प्रेमाचे उतराई मी माझ्या आयुष्यात कधीही करू शकणार नाही असे विजय सेभेला संबोधन करताना प्राध्यापक राम शिंदे यांनी केले.

मतदारांनी जो विश्वास भाजप व माझ्यासह 15 नगरसेवकांवर टाकला आहे, त्याला कधी ही तडा जाऊ देणार नाही.
प्रांजल चिंतामणी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT