अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील जैन समाजाच्या श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टची जागा बळकाविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सुरू आहे, असा आरोप शिवसेना (उबाठा) अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. या जागेवर जगताप यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय थाटले असून जागेच्या काही ट्रस्टींच्या मदतीने ही जागा विकत घेण्याचा घाट घातला जात असल्याचाही आरोप काळे यांनी केला. (Latest Ahilyanagar News)
पुणे श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काळे म्हणाले, पुण्यातील जैन बोर्डींगची जागा घशात घालण्याचा प्रयत्न जसा झाला, तसाच प्रयत्न अहिल्यानगर येथेही सुरू आहे. हुंडेकरी चाळ येथील फायनल प्लॉट नं. ११९ ही ५००० स्क्वेअर फूटाची जागा मंगुबाई हिरालाल व्होरा यांनी जैन मंदिराला (जैन समाजाच्या श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ ट्रस्ट) दान दिली आहे. त्यावेळी व्होरा यांनी केलेल्या मृत्यूपत्रात विकता येणार नाही, किंवा ती इतर वापरासाठी कोणाला देता येणार नाही, असे नमूद केले आहे. मात्र, संग्राम जगताप यांनी येथील काही ट्रस्टींना हाताशी धरून ही जागा बळकाविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
गेल्या वर्षभरापासून या जागेवर जगताप यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय थाटले आहे. या जागेबाबत एका वृत्तपत्रात नोटीसही प्रसिद्ध करून विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत आम्ही सर्व पुराव्यासह सह धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे. या अर्जाद्वारे जागेची बेकायदेशीर विक्री थांबविण्याची विनंती केली आहे, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून ट्रस्टचे अध्यक्ष, ट्रस्टी यांना नोटीस बजावून खुलासा मागवावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे काळे यांनी सांगितले.