Ahilyanagar Industrial Investment Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Industrial Investment: अहिल्यानगरात १३ हजार कोटींची गुंतवणूक! ७८ उद्योगांशी करार; औद्योगिक विकासाला नवी झेप

उद्योजकांसाठी सुरक्षित वातावरणाची ग्वाही; ‘कार्गो हब’सह सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर प्रकल्पांचेही संकेत

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात ७८ उद्योजकांनी सुमारे १३ हजार कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक औद्योगिक क्षेत्राला नवा आत्मविश्वास देणारी आहे. औद्यगिक विकासाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या या सकारात्मक वातावरणामुळे उद्योजक जिल्ह्यात निर्भयपणे गुंतवणूक करून रोजगार निर्माण करतील, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. नवीन उद्योगांसाठी गुंतवणूक करणाऱ्या उद्योगास सुरक्षा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देखील त्‍यांनी दिली.

शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने शनिवारी (दि.२२) जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍याप्रसंगी ते बोलत होते. आमदार काशिनाथ दाते, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक दीपक शिवदास, जिल्‍हा उद्योग अधिकारी अशोक बेनके आदींसह उद्योजक अरविंद पाडगावकर, प्रकाश भामरे, बाबासाहेब काळे, गिरधर आसणे, भाजपचे जिल्‍हा समन्‍वयक विनायक देशमुख, जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग, नगर शहर जिल्‍हाध्‍यक्ष अनिल मोहिते आदींची उपस्‍थिती होती.

पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात ७८ उद्योगांशी उद्योग विभागाच्या माध्यमातून करार करण्यात आले. यावेळी सुमारे १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या माध्यातून झाली. गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांचा प्रारंभी पालकमंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते सन्मान करण्‍यात आला.

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी जागांची उपलब्धता करून दिल्यानंतर पहिला संरक्षण प्रकल्प निबे ग्रुपच्‍या माध्यमातून जिल्ह्यात झाला. भविष्यात बेलवंडी, हरेगाव येथेही संरक्षण उत्पादनाचे प्रकल्प कार्वान्वित होणार असल्याचे सांगून, यापूर्वी असे प्रयत्न जिल्ह्यात झाले नाहीत. त्यामुळे औद्योगिक विकासात जिल्हा मागे राहिला. धाक दडपशाहीमुळे उद्योग माघारी गेल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. गुंतवणूक किती कोटींची यापेक्षाही तरूण उद्योजकांच्या धाडसाला महत्व असल्‍याचे त्यांनी आवर्जून सांगितले. उद्योजकांना सुरक्षा वाटेल, त्यांना पायाभूत सुविधा तसेच कामागारांना संरक्षण मिळेल असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आता उद्योग विभागाला घ्यावी लागेल, असे सांगत पालकमंत्री विखे पाटील यांनी त्‍यांना त्‍यांच्‍या अधिकाराची जाणीव करुन दिली.

सहआयुक्त वृषाली सोनी यांनी प्रस्‍ताविक केले. उद्योजकांसाठी आवश्‍यक असलेल्‍या १७६ परवानग्या एकाच छताखाली उपलब्ध असून, याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा असे आवाहनही त्‍यांनी केले. उद्योजक अरविंद पारगावकर व अद्विक ग्रुपचे मायकल यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्‍हा ‘कार्गो हब’च्‍या मार्गावर

अहिल्‍यानगर जिल्हा आता छत्रपती संभाजी नगर व पुणे या मोठ्या औद्यगिक पट्ट्याला जोडणारे केंद्र झाले. रस्ते विकास आणि शिर्डी विमानतळाचा विस्तार होत असून, ‘कार्गो हब’ निर्माण होईल. जिल्ह्यात सेमी कंडक्टरचा प्रकल्प आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे.जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उजनी प्रकल्पावर डेटा सेंटर उभारले जाणार असून, सुमारे ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करीत असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

अहिल्‍यानगर जिल्हा मुख्य औद्यगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे. यापूर्वी औद्योगिक विकासात थोडे नकारात्मक वातावरण होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात येत असलेल्या गुंतवणूकीचा लाभ जिल्ह्याला होत असल्याने औद्योगिक क्षेत्रात सकारत्मक वातावरण निर्माण होत असल्याचे समाधान आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT