HPV Vaccine Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar HPV Vaccination Drive: महिला दिनापासून शहरात HPV लसीकरण मोहीम; मुलींना कर्करोगापासून संरक्षण

महानगरपालिकेचा पुढाकार; शहरातील नागरी आरोग्य केंद्रांवर लस उपलब्ध, लाभार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नगर: महानगरपालिका क्षेत्रात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून, या संदर्भात महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नुकतीच बैठक घेतली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला असून, आता राज्य स्तरावर 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेला सुरुवात होत आहे.

या पार्श्वभूमीवर आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाला ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याच्या आणि लाभार्थ्यांचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील सर्व आरोग्य केंद्रावर 8 मार्चपासून ही सुविधा उपलब्ध असेल, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

मोहिमेबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी बैठकीत माहिती दिली. भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा असून 99.7 टक्के रुग्ण हे एचपीव्ही विषाणूमुळे बाधित होतात. या आजारावर संरक्षण मिळवण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे.

शहरातील विविध नागरी आरोग्य केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केडगाव, जिजामाता, महात्मा फुले, तोफखाना, सिव्हिल, मुकुंदनगर आणि नागापूर येथील आयुष्मान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे लसीकरण सत्र राबवले जाईल.

प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांची टीम तैनात असेल, तर आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका लाभार्थी मुलींना केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी पार पाडतील. पात्र लाभार्थी मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT