Hotel License Suspended Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Hotel License Suspended: अहिल्यानगरात मोठी कारवाई! हॉटेल संगमसह 6 हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेवर अन्न व औषध प्रशासनाचा दणका

राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई; शहरातील नामांकित हॉटेलांवरही पडला फटका

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर शहरात भाजपाचे पदाधिकारी तथा माजी उपमहापौरांच्या स्टेशन रस्त्यावरील हॉटेल सगम यासह अन्य सहा हॉटेलचे अन्न व औषध प्रशासनाने परवाने निलंबित केले आहेत. सर्वच हॉटेलमध्ये अस्वच्छता असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली. त्यास अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे शहरातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्वच अस्थापनावर कारवाईचा धडका लावला आहे. अवैध गुटखा व सुगंधीत तंबाखूवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात दूध भेसळीची पावडर व रसायने पकडली.

त्याच गुन्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी परिसरातही दूध संकलन केंद्र व दूध डेअरीवर छापे घालून कारवाई करण्यात आली. नगर शहरात के. के. इंटरप्रायजेसवर छापा घालून मोठ्या प्रमाणात दूध पावडर आढळली असून, त्याचा अन्न व औषध प्रशासनाकडून तपास सुरू आहे. ती दूध पावडर शहर व जिल्ह्यात कोठे वितरित झाली याची तपासणी सुरू आहे.

त्याचबरोबर स्वच्छतेसह अन्य निमयमांचे पालन न करणाऱ्या हॉटेलवरही कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने अहिल्यानगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील अनेक हॉटेलची तपासणी केली. त्यात हॉटेल संगम, हॉटेल सत्कार या दोन हॉटेलवर कारवाई करण्यात आली. हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याचा ठपका ठेवत परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, शहरातील नामांकित हॉटेलवर कारवाई झाल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

माहिती दडवण्याचा प्रयत्न

अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळ असतानाही अधिकाऱ्यांची कारवाई करताना दमछाक होत आहे. वेगवेगळ्या सेक्टरला स्वतंत्र अधिकारी आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांकडून माहिती दडविण्याचा प्रयत्न होत आहे. कोणालाही कारवाईची माहिती देऊ नका, असा फतवा आयुक्त स्तरावरून काढल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT