

नगर: जेलमधून जामिनावर सुटल्यानंतर बेकायदेशीररीत्या विनापरवाना रॅली काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या व सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (वय १९, रा. बोल्हेगाव फाटा, ता. जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
आरोपी भोऱ्या हा खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्या मधील प्रमुख आरोपी असून, ४ जुलै २०२६ रोजी त्याची जिल्हा कारागृहातून न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. जेलमधून सुटताच आरोपी भोऱ्या आणि त्याच्या १० ते १५ साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवला.
त्यांनी सबजेल कारागृहापासून ते नागापूर एमआयडीसी भागापर्यंत मोटारसायकलवर स्वार होऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत, घोषणाबाजी करत विनापरवाना रॅली काढली. या बेकायदेशीर रॅलीचा व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात केला.
या प्रकाराची गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी भोऱ्यासह धीरज उर्फ जॉकी जॉन आवारे, सुजल उर्फ गोट्या भाकरे, चेतन उर्फ भैय्या संतोष सरोदे, यश शिरसाठ, निकेश विश्वास कळकुंबे, गणेश विठ्ठल काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यातील मुख्य आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, सहायक फौजदार राकेश खेडकर, पोलिस अंमलदार राजू सुद्रिक, शैलेश रोहोकले, संदीप पवार, गणेश चौधरी, किशोर जाधव यांच्या पथकाने केली.