अकोले: भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापुंजी असलेल्या घाटघर येथे ३२१, तर रतनवाडी येथे ३२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ६०४ (५०.८६ टक्के) दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणाचा साठा २११६ (२५.३८ टक्के) दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे.
पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या घाटघर, रतनवाडी, साम्रद, भंडारदरा, पांजरे, बारी, कुमशेत, पाचनई, अंबित, कोलटेभे, पेठेतील परिसराला मुसळधार पावसाने झोडपले आहे. मुळा-प्रवरा पाणलोटात नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, तलाव ओव्हरफ्लो आहेत. वाकी, अंबित, पिंपळगाव खांड धरणे ओव्हरफ्लो झाल्याने मुळा, प्रवरा नदी दुधडी भरून वाहत आहे. शेती पाण्याखाली गेली आहे. जनजीवन कोलमडले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी भंडारदरा परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.
हरिश्चंद्रगड, कुमशेत आणि पाचनई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे पिंपळगाव खांड धरणावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग मुळा धरणाच्या दिशेने सुरू असून नदीच्या पातळीत झपाट्याने वाढत होत आहे. त्यामुळे लहीत खुर्द–लहीत बुद्रुक जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांमधील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनी जीव धोक्यात घालून पूरग्रस्त पूल न ओलांडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोतुळेश्वर मंदिर सुमारे पाच फूट पाण्याखाली गेले असून परिसर जलमय झाला आहे. कोतूळ परिसरात कोहने, कोतूळ, ब्राह्मणवाडा, वाघापूर, लिंगदेव आदी गावांत वीज खांब कोसळल्याने व तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. हवामान विभागाने परिसरात आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटन स्थळे बंंद
हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वन परिक्षेत्रातील पर्यटनस्थळे असलेली सांदनदरी, कोकणकडा, रतनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, कळसुबाई शिखर, हरिचंद्रगड, भैरवगड, गड-किल्ले, हपाट्याचा कोकणकडा, रिव्हर्स वॉटरफॉलसह इतर वॉटर फॉल तसेच इतर साहसी खेळास पुढील आदेशापर्यत पर्यटकांसाठी बंद करण्यात येत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे, रुपेश गावित यांनी सांगितले.
आर्वी बेटाला पाण्याचा वेढा
भीमा नदीचा १ लाख ५६ हजार १८७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटाला पाण्याचा वेढा पडून तेथील १८५ व्यक्तींचा संपर्क तुटला आहे. या व्यक्तींकडे रेशन आणि औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. या बेटावरील नागरिकांना दळणवळणासाठी प्रशासनाची एक बोट उपलब्ध केली आहे. पावसामुळे इतर ठिकाणी नद्या, नाले वाहत असतील तर नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच काही अडचणी असतील तर महसूल, पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले आहे.
मुळा धरणात विक्रमी आवक
पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाकडे विक्रमी वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत जवळपास एक टीएमसी (सुमारे ९६७ दलघफू) नव्या पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि जलव्यवस्थापन यंत्रणांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल मंगळवारी (दि. ७) कोतुळमार्गे मुळा धरणाकडे तब्बल ३७ हजार ८७५ क्युसेक वेगाने पाणी धावत होते. सध्या धरणातील एकूण जलसाठा ७ हजार ६०५ दलघफू झाला आहे. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने मुळा धरणाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. मात्र, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांमध्ये सुरू झालेल्या दमदार पावसाने परिस्थितीला कलाटणी दिली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आंबित येथे ६०४ मि.मी., विहार ४५५ मि.मी., खडकी २६४ मि.मी., कोतुळ १५५ मि.मी., मुळानगर ११७ मि.मी., डोळसणे १०५ मि.मी., चिखलठाण ७२ मि.मी., चास ७० मि.मी. आणि टाकळी ढोकेश्वर येथे ३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डोंगरदऱ्यांतून वाहणारे ओढे-नाले पुन्हा एकदा खळाळून वाहू लागल्याने त्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर मुळा धरणात दाखल होत आहे.
सध्या धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असली तरी उपलब्ध जलसाठा लक्षात घेता तातडीने विसर्ग करण्याची आवश्यकता नसल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.