नगर: गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढू लागले आहे. सोमवारी (दि.13) सकाळी आठपासूनच उन्हाचे चटके बसण्यास प्रारंभ झाला. या उन्हाच्या कडाक्यात दिवसभर अंगाची लाहीलाही झाली असून, जनजीवनच विस्कळित झाले. तापमापीतील पारा सोमवारी 40 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविला गेला आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात कोरडे हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानवी व प्राण्यांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. सोमवारी (दि.14) मात्र सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. सकाळी आठपासून उन्हाचा चटका बसू लागला. दुपारी 12 वाजल्यानंतर ही परिस्थिती अधिकच तीव्र झाली. तापलेले रस्ते आणि उन्हाची तीव्रता यांमुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांबरोबरच दुचाकीचालकांची लाहीलाही झाली.
रात्रीही उकाडा वाढला होता. या पार्श्वभूमीवर आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसताच नागरिकांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 1077, 102, 104, 108 व 112 या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अशी काळजी घ्या
नागरिकांनी तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून ओआरएस, लस्सी, ताक, कैरीचे पन्हे व लिंबू पाण्याचा नियमित वापर करावा. दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. घराबाहेर पडताना छत्री वा टोपीचा वापर करावा. पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवावे. अशक्तपणा, डोकेदुखी व सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.