नगर: दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादात आई-वडिलांनी मुलाला दांडक्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मुलाला उपचाराविना घरातच ठेवले. दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांनी त्याचा मृतदेह पहाटेच घरापासून चार किलोमीटरवर शेतात नेऊन जाळून टाकला. अहिल्यानगर तालुक्यातील गुणवडी शिवारात रविवारी (दि.४) सकाळी ही घटना उघडकीस आली.
प्रवीण प्रकाश लांडगे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या सुरत येथे राहणाऱ्या भावानेच दिलेल्या माहितीनंतर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून वडील प्रकाश विनायक लांडगे आणि आई आशा (रा. गुणवडी) यांना अटक केली.
सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारूळे यांनी याबाबत माहिती दिली. दारूचे व्यसन असलेला प्रवीण मूकबधिर होता. तो आई-वडिलांसोबतच राहत होता. दारूच्या व्यसनावरून त्याचे वारंवार आई-वडिलांशी वाद होत होते. काही दिवसांपूर्वीच प्रवीण दारू पिऊन घरी आला, तेव्हा त्याचा पुन्हा आई-वडिलांशी वाद झाला.
त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. वडिलांनी दांडक्याने केलेल्या मारहाणीत प्रवीण गंभीर जखमी झाला. मात्र, त्याला रुग्णालयात न नेता घरातच ठेवण्यात आले. जखमी प्रवीणचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी मृत्यूची माहिती कोणालाही न देता पहाटेच मृतदेह सुमारे चार किलोमीटरवर स्वत:च्या शेतात नेऊन जाळून टाकला.
दरम्यान, रविवारी (दि. ४) सकाळी तालुका पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि प्रवीणच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी प्रवीणचा खून केल्याची कबुली दिली.