Pandhurli Gram Panchayat Scam  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Gram Panchayat Awards: अहिल्यानगरच्या ग्रामपंचायतींची बाजी! रेनवडी, लोणीसह पाच ग्रामपंचायतींना लाखोंची बक्षिसे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात रेनवडीला ८० लाख, लोणीला ६० लाख; जिल्हास्तरावर कासार पिंपळगाव प्रथम

पुढारी वृत्तसेवा

नगर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचे पुरस्कार शासनाकडून जाहीर झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.

नाशिक विभागस्तरीय पुरस्कारांमध्ये पारनेर तालुक्यातील रेनवडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावत ८० लाख रुपयांचे बक्षीस मिळविले, तर राहाता तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकासह ६० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. विभाग स्तरावरील प्रथम क्रमांकाचे एक कोटी रुपयांचे बक्षीस नाशिक जिल्ह्यातील दुगाव ग्रामपंचायतीला मिळाले आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी प्रभावीपणे राबवले. साधारणतः 200 पेक्षा अधिक गावांनी यात सहभाग नोंदवला. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यासाठी मोठे योगदान दिले. त्याचे वेगवेगळ्या टप्प्यांवर मुल्यमापन झाले. त्यानंतर निकाल जाहीर झाला आहे.

जिल्हास्तरावरही तीन ग्रामपंचायतींना लाखोंची बक्षिसे

जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्येही अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी बाजी मारली आहे. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवत ५० लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकासह ३० लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले, तर नगर तालुक्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावत २० लाख रुपयांचे बक्षीस मिळविले आहे.

ग्रामीण विकासाला गती मिळतेय!

ग्रामविकास, लोकसहभाग, प्रशासकीय कार्यक्षमता आणि विविध विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर या ग्रामपंचायतींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विभागस्तरावर दोन आणि जिल्हास्तरावर तीन ग्रामपंचायतींनी मिळविलेले हे यश जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT