Ahilyanagar Government Employees Strike Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Government Employees Strike: अहिल्यानगरात कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा; जुनी पेन्शनसाठी आंदोलन तीव्र

18 मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास अन्नत्यागाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नगर: सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप चौथ्या दिवशी अधिकच तीव्र झाला असून, कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत आक्रोश व्यक्त केला. अद्यापही याबाबत शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांत नाराजीचे वातावरण पसरले आहे.

जलसंपदा विभागाच्या कार्यालयात एकत्रित होत कर्मचाऱ्यांच्या मोर्चास प्रारंभ झाला. समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, अशोक मासाळ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. भर उन्हात निघालेल्या या मोर्चात कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.

या मोर्चात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन झगडे, तसेच विलास पेद्राम, वंदना नेटके, विजय काकडे, भागवत नवगण, भाऊ शिंदे, वैशाली बोडखे, पुरुषोत्तम आडेप, विलास पेद्राम, संदिपान कासार.

जीएसटी विभागाच्या वर्षा पारधी, दीपक चन्ने, उषा पारधी, आप्पासाहेब जगताप, प्रसाद साठे, प्रमोद सूर्यवंशी, प्रमोद जोशी, शंकर जगताप, स्वाती राठोड, वनश्री खजिनदार, सुषमा उमाप, ज्योती दांगट, राहुल कोळेकर आदींसह कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. शासनाने प्रलंबित असलेल्या 18 मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी भूमिका यावेळी आंदोलक नेत्यांनी मांडली.

...तर अन्नत्याग करणार

महसूल विभागाचे कर्मचारी अशोक मासाळ यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठविले. मासाळ यांनी आता अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपर्यत जुनी पेन्शन योजनाची अंमलबजावणी, निवृत्ती वर्षे 60 वर्षे, 353 कलमात दुरुस्ती व कंत्राटी बांधवांना न्याय या मागण्यांवर ठोस निर्णय घ्या. अन्यथा स्वत: अन्नत्याग करेल, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री यांना 24 एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रातून दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT