नगर : देशामध्ये इंदोर हे स्वच्छ शहर म्हणून ओळखले जात असून, आपले शहरही स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची खरी गरज आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. आता शहरात महापालिकेच्या माध्यमातून 80 घंटागाड्या धावणार असून, नागरिकांनी कचरा घंटागाड्यांमध्येच टाकावा, असे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)
वाडिया पार्क येथे आ. जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर महापालिकेतर्फे 80 घंटागाड्या कचरा संकलन कामाचा प्रारंभ हायजिन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली गांधी यांच्या हस्ते झाला. या वेळी आ. जगताप बोलत होते.
आ. जगताप म्हणाले की, मुंबईप्रमाणेच नगरमध्येही रस्ता काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. काही संस्थांच्या माध्यमातून चौक सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. हायजिन फर्स्टच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना हॉटेल हातगाड्यांच्या माध्यमातून स्वच्छ अन्न मिळावे यासाठी जनजागृतीचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहरांमधील कचरा संकलन करण्यासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट ही एजन्सी नव्याने नेमली असून, 80 घंटागाड्या घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणार आहे. याचबरोबर घंटागाडी आपल्या घरी नाही आली, तर हेल्पलाइनवर फोन करावा. तातडीने घंटागाडी उपलब्ध होईल. देशामधील स्वच्छतेच्या स्पर्धेमध्ये ड वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये अहिल्यानगर महापालिकेचा देशात पाचवा क्रमांक आला आहे. हाच क्रमांक एकपर्यंत घेऊन जायचा आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा घंटागाडीमध्येच टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.
वैशाली गांधी म्हणाल्या की, हायजिन फर्स्ट या संस्थेच्या माध्यमातून हायजिन सिटी बनवण्याचे काम सुरू आहे. शहरातील नागरिकांनी आपले घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
मनोज कोतकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. ती सोडविण्यासाठी आ. जगताप यांनी प्रयत्न केल्यामुळेच 80 घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. आता कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला जाईल, असे ते म्हणाले.
शहरातील काही नागरिक घंटागाडी येऊनही रस्त्यावर, नालीमध्ये कचरा टाकण्याचे काम करत आहे, तसेच बांधकाम साहित्य सर्वत्र पडलेले दिसत आहे. त्यामुळे गटारे बंद झाले आहेत. महापालिकेने आतापर्यंत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही. यापुढील काळात जो कोणी रस्त्यावर कचरा टाकेल त्याच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई महापालिका प्रशासनाने करावी, असे आ. जगताप म्हणाले.
उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना जर काम करायचे नसेल तर त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावे. त्यांनीही शहरात फिरून काम केले पाहिजे; अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.