नगर: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अहिल्यानगर शहर फ्लेक्समुक्त करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. त्यानुसार १ डिसेंबर २०२६ पासून शहरात तात्पुरते फ्लेक्स, बॅनर, पोस्टर, अनधिकृत जाहिराती आढळल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांनी फ्लेक्स बोर्ड स्वतः काढून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे केले आहे.
महापालिकेच्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या महासभेत अहिल्यानगर फ्लेक्समुक्त करण्याबाबत ठराव घेण्यात आला. त्यानुसार १ डिसेंबर २०२६ पासून शहरात फ्लेक्समुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शहरातील विविध भागांत लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर हटविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील प्रमुख चौक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि विविध परिसरांमध्ये विनापरवानगी फ्लेक्स लावण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. वाढदिवस, राजकीय कार्यक्रम, नेत्यांचे स्वागत, विविध शुभेच्छा संदेश तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक उभारले जातात.
त्यामुळे शहराचे सौंदर्य बाधित होण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणांचे विद्रूपीकरण होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने फ्लेक्समुक्त शहराचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी नियमांनुसार परवानगी घेऊन फ्लेक्स लावण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र, आता १ डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारच्या फ्लेक्स बोर्डला परवानगी दिली जाणार नाही.
महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी या निर्णयाची माहिती देताना, १ डिसेंबरपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शहरात फ्लेक्स बोर्ड लावून विद्रूपीकरण केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तसेच संबंधित फ्लेक्स किंवा बॅनर हटविण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. हा खर्च देण्यास टाळाटाळ केल्यास त्याची रक्कम घरपट्टीमध्ये समाविष्ट करून वसूल करण्यात येणार असल्याचेही आयुक्त डांगे यांनी सांगितले