Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Mayor Election: अहिल्यानगरच्या पहिल्या महापौरपदी ज्योती गाडे; उपमहापौरपदी धनंजय जाधव

नामांतरानंतरचा मानाचा पदभार; भाजप-राष्ट्रवादी युतीची सत्ता, शिवसेनेची भूमिका अद्याप संदिग्ध

पुढारी वृत्तसेवा

नगर: भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची मेहुणी ज्योती गाडे या नामांतरानंतर अहिल्यानगरच्या पहिल्या महापौर म्हणून कारभार पाहणार आहेत. विखे कुटुंबियांशी एकनिष्ठ असणारे धनंजय जाधव यांची निष्ठा उमहापौरपदासाठी फळाला आली.

महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी तीन नगरसेविका होत्या. मात्र यातून ज्योती गाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्योती गाडे यांची दुसरी टर्म आहे. राखीव पदासाठी मुळ ओबीसीचा चर्चेला आलेला मुद्दाही या निवडीने फोल ठरविला. ‌‘चांगले यश मिळाले, वावड्याकडे लक्ष द्यायची गरज नाही‌’, अशा शब्दांत मंत्री विखे पाटील यांनीही त्या चर्चेला पूर्णविराम दिला. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप हे अहिल्यानगर शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून त्यासाठी निधी आणला जाईल, असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

महापौरपदासाठी नाव निश्चिती झालेल्या ज्योती गाडे या दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या आहेत. त्यांची बहिण माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी सुवर्णा या उपमहापौर होत्या. तर दुसरी बहिण आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल या नगरसेविका होत्या. या दोघीनंतर ज्योती गाडे यांनी मानाच्या महापौर पदाला गवसणी घातली आहे. ज्योती गाडे यांच्या महापौरपदाच्या रुपाने मंत्री विखे पाटील व आ. जगताप यांनी दिवंगत कर्डिले यांच्याप्रती आस्था दाखविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उपमहापौरपद ॲड. धनंजय जाधव यांना देण्याचे निश्चित झाले. ते माजी उपनगराध्यक्षा दिवंगत कृष्णा जाधव यांचे चिरंजीव आहेत. स्व. कृष्णाभाऊ यांच्यापासून जाधव कुटुंब हे विखे कुटुंबाशी एकनिष्ठ प्रमाणिक आहे. 1991 मध्ये दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणेतून लढविलेल्या लोकसभा निवडणुकीची पहिली बैठक सावेडीतील जाधव मळ्यात स्व. कृष्णा जाधव यांच्याच पुढाकारातून झाली होती. ॲड. धनंजय यांचे डॉ. सुजय यांच्याशी मैत्रीचे संबंध तर आ. संग्राम जगताप यांचे ते वर्गमित्र आहे. हाच जिव्हाळ्याचा संबंध ॲड. धनंजय यांना कामी आला अन्‌‍ ते उपमहापौर झाले.

शिवसेनेची भूमिका संदिग्ध

शिवसेनेने दहा जागा जिंकल्या आहेत. मात्र सत्ता स्थापन करताना भाजप-राष्ट्रवादी युतीने शिवसेनेला बाजुला ठेवल्याचे दिसून आले. शिवसेना भाजप-राष्ट्रवादी सत्तेला पाठिंबा देणार की विरोधी पक्षाची भूमिका बजावणार? हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. शिवसेनेने शहर व जिल्ह्ा प्रमुखांचा झालेल्या पराभवामुळे शिवसेनेचा निर्णय संदिग्धता निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान शिवसेनेच्या दहा नगरसेवकांची नाशिक येथे आज गटनोंदणी करण्यात आली. गटनेते म्हणून ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय कावरे यांची निवड करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT