Inflation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Festival Shopping: पोळा-गणेशोत्सवावर महागाई आणि दुष्काळाचे सावट; नगरच्या बाजारपेठेत ग्राहकांची पाठ

पावसाअभावी खरिपाची पिके करपली; किराणा, भाजीपाला महागल्याने सणासुदीची खरेदी मंदावली

पुढारी वृत्तसेवा

गौरव साळुंके

नगर: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या पोळा सणासह गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली असली, तरी यंदाच्या सण-उत्सवावर महागाई आणि दुष्काळाचे संकट ओढवले आहे. एका बाजूला पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून हवालदिल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरीकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

दुष्काळी परिस्थिती आणि वाढलेल्या महागाईमुळे सणासुदीच्या तोंडावर बाजारपेठेतील उलाढाल मंदावल्याने जिल्ह्यातील व्यापारी आणि व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत. महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. ऐन पिके वाढीच्या आणि हातात येण्याच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाची पिके डोळ्यादेखत करपू लागली आहेत.

अनेक तालुक्यांमध्ये पावसाअभावी सोयाबीन, मका, कापूस पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, बाजारात सर्वच वस्तूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे थेट किराणा आणि भाजीपाला महागला आहेत. मागील काही महिन्यात विविध किराणा साहित्यात दरवाढ झाली आहे. सणासुदीला लागणारे गोडतेल, साखर, डाळी, रवा आणि मैदा, अशा विविध वस्तूंचे भाव कडाडले आहेत. तसेच पावसाअभावी भाजीपाल्याचे दर वाढले असून जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि इतर भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे.

त्यामुळे सण साजरा करावा की महिन्याचे रेशन भरावे, असा प्रश्न पडला आहे. हजार रुपयांची नोट बाजारात कुठे विरघळते, हेच समजत नाही, अशी प्रतिक्रिया गृहिणी देत आहेत. दरवर्षी सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदा शहरातील चितळे रोड, कापड बाजार, तसेच श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव यांसारख्या प्रमुख शहरांमधील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमालीची घटली आहे.

पाऊस गायब, बाजारपेठेला फटका

सध्या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भाग शेतीवर अवलंबून असल्याने बळीराजा खचल्याचा फटका बाजारपेठेला बसत आहे.

आवश्यक तेवढीच खरेदी

नागरिक केवळ सणाची परंपरा राखण्यासाठी आवश्यक तेवढीच खरेदी करत असून कपडे, सोने, पादत्राणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देणे टाळत आहेत. ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार आणि बँकेचे हप्ते कसे भरायचे, या विवंचनेत आम्ही आहोत, अशी खंत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

जगणे झाले कठीण

निसर्गाचा लहरीपणा आणि प्रशासकीय पातळीवर महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक घटक होरपळून निघत आहे. उत्सव हा चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी असतो, पण यंदा सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT