Fake Milk Pudhari
अहिल्यानगर

Fake Milk Racket: मंचर दूध भेसळ प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत; राहुरीतील तिघांसह चौघांवर गुन्हा

कृत्रिम दूधनिर्मितीच्या फॉर्म्युल्याचा पुरवठा झाल्याचा संशय; अन्न व औषध प्रशासनाची जिल्हाभर छापेमारी, मोठ्या साखळीचा तपास वेगात

पुढारी वृत्तसेवा

नगर: पुणे जिल्ह्यातील मंचर येथून दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर, त्याचे धागेदोरे आता अहिल्यानगरपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात राहुरीच्या तिघांसह वाळकीचा (ता. अहिल्यानगर) एक, अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नगरचा एक मोठा ब्रॅण्डही संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, येणाऱ्या काळात ही व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी सुशांत हिंगे याच्या नवकार डिस्ट्रिब्युटरच्या गोदामावर छापा टाकला. त्या वेळी वेगवेगळ्या पावडरच्या गोण्या, द्रवरूप रसायने आढळली. या पावडरचा पुरवठा हेमंत टेके करत होता, तर भिवंडीचा संजोग यादव हा रसायने पुरवत होता, अशी माहिती चौकशीतून मिळाली. या साहित्यासह वेगवेगळी पावडर, व्हेजिटेबल ऑईल, डिटर्जंट व अन्य रासायनिक द्रव वापरून हिंगे कृत्रिम दूधनिर्मितीचा एक फॉर्म्युला तयार करून देत होता. याद्वारे एकाच वेळी किमान 1000 लिटर कृत्रिम दूध निर्मिती करणे शक्य होते. हा फॉर्म्युला सहा जिल्ह्यांतील दूध संकलन केंद्र चालकांपर्यंत पोहचवला जात होता. त्यासाठी संपर्क आणि पुरवठा अशी स्वतंत्र साखळीही कार्यान्वित होती.

मंचरच्या हिंगेकडून तसेच त्याच्या साखळीमधून राहुरी तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) प्रमोद घोरपडे, सात्रळचा प्रमोद कडू, राहुरीचा अजित करंडे, तसेच वाळकीचा (ता. अहिल्यानगर) शुभम गिरवले यांनीही कृत्रिम दूध निर्मितीचा हा फॉर्म्युला विकत घेतला होता, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांनाही संशयित आरोपी केले आहे.

तपासात नगरची ही नावे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित आरोपींनी कृत्रिम दूध निर्मिती केली का, ती किती लिटर केली, यातून पुरवठा किती केला, किती विक्री केली, याची चौकशी केली जात आहे. त्यासाठी रविवारी सकाळपासूनच मंचर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर टीमने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले. विशेषतः आरोपींच्या दूध संकलनातून काही नमुनेही तपासणीसाठी घेतल्याचे समजते. याशिवाय मोबाईल, सीसीटीव्ही, वाहतूक व्यवस्था याचाही बारकाईने अभ्यास केला जात असून, यातून सहआरोपींपर्यंत पोहचण्याचा माग प्रशासनाने काढल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

पुण्याच्या अन्न व औषध प्रशासन अधिकारी स्वाती मस्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस कॉन्स्टेबल सुनील काठे यांनी मंचर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून सहा जिल्ह्यांतील 26 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जामखेडनंतर पुन्हा कृत्रिम दूध चर्चेत

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथून बनावट दूध निर्मितीचा भांडाफोड करण्यात आला होता. दुधात पॅराफिन, विशिष्ट रासायनिक पावडर आणि कृत्रिम फ्लेवरयुक्त द्रव वापरून फॅट वाढवले जात होते. अवघ्या 200 लिटरच्या केमिकलपासून तब्बल अडीच हजार लिटर बनावट दूधनिर्मिती केली जात असल्याचे पुढे आले होते. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 41 जणांवर गुन्हे दाखल केले होते. विशेष म्हणजे कृत्रिम रसायन पुरवणारा मास्टरमाईंड राहुरीचाच समीर शेख होता. आता मंचर प्रकरणातही पुन्हा आरोपींच्या यादीत तिघे जण राहुरीचे असल्याने राहुरी तालुक्यातील दूध संकलन केंद्र आणि छोटे-मोठे प्लॅन्टही प्रशासनाच्या रडारवर आल्याचे समजते.

नगरमध्येही छापा

शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील झोपडी कॅन्टीन परिसरात एका दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा घालून दूध पावडरचे नमुने ताब्यात घेतले. तेथून जिल्ह्यात व शहरात दूधपावडर वितरित झाल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासन पथकाने दिवसभर पायी फिरून विविध दुकानांच्या आस्थापना तपासल्या. ही पावडर नामांकित कंपन्यांची असल्याचे समजते. त्याचा भेसळीसाठी वापर होतो की काय अशी शंका आहे. त्यामुळे त्याचे रेकॉर्ड प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.

कोणालाही सोडणार नाही: आयुक्त तुकाराम मुंडे

नाशिक विभागातीलही मिल्क पावडर प्लॅन्टचे इन्स्पेक्शन सुरू करण्यात आलेले आहे. यातही काही गंभीर बाबी समोर येत आहेत. ही पावडर पुढे कोणाला पाठवली जाते, शेतकऱ्यांकडे पोहचते का, याबाबतची चौकशी केली जाणार आहे. तसेच मंचरच्या आरोपींच्या मोबाईलमधून काही मेसेज सापडले आहेत. यामध्ये कोणाला, कधी व किती भेसळीचे साहित्य पाहिेजे, हे हाती आले आहे. त्यानुसार सव्वीस लोकांची माहिती पुढे आली. यात राहुरीचा प्रमोद घोरपडे हाही आहे. दरम्यान, भेसळीतील साखळीची मोठी व्याप्ती आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा निर्धार आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मंगळवारी माध्यमांसमोर व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT