नगर: 1 जानेवारी ते 28 एप्रिल 2026 दरम्यान अमली पदार्थ बाळगणाऱ्या 9 प्रकरणांमध्ये 12 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अमली पदार्थ सेवनाच्या 26 प्रकरणांमध्ये 32 व्यक्तींवर अशा प्रकारे अमली पदार्थांच्या एकूण 40 प्रकरणांमध्ये 55 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.29) जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गिते बोलत होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी हरिष भोये भोये यांनी गेल्या चार महिन्यांतील कारवाईची बैठकीत माहिती दिली. अंमली पदार्थ लागवडीच्या प्रकरणातील 2 गुन्ह्यांमध्ये 3 व्यक्तींवर, वाहतुकीसंदर्भातील 3 प्रकरणांमध्ये 8 व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
अंमली पदार्थांबाबतची माहिती जाणून घेतल्यानंतर , जिल्हाभरात अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईची मोहिम अधिक कठोर करण्याचे निर्देश गिते यांनी दिले. शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर देण्यात यावा.
ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता सुनिश्चित करून तपास यंत्रणेला अधिक बळकटी देण्यात यावी. पोलिस विभाग, एनसीबी व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कारवाईची माहिती एकत्रित करून अद्ययावत डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी गिते यांनी यावेळी दिल्या.