नगर: उन्हाचा तडाखा आणि भूजलपातळीत दिवसेंदिवस होत असलेल्या घटमुळे जिल्ह््यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्यादेखील वाढू लागली आहे. शेवगाव व जामखेड या दोन तालुक्यांनादेखील पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वीच या दोन्ही तालुक्यांत टँकर सुरू झाले आहेत. दरम्यान, जिल्हाभरात आजमितीस 111 गावे आणि 650 वाड्यांत पाणीटंचाई असून, येथील 1 लाख 99 हजार 435 लोकसंख्येला 107 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपर्यंत अकोले, संगमनेर, अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी व कर्जत, नेवासा या सात तालुक्यांतील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसल्याने या गावांतील जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
आता शेवगाव तालुक्यातील 4 गावे आणि 14 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रांताधिकाऱ्यांनी चार टँकर सुरू केले आहेत. जामखेड तालुक्यातील 3 गावे आणि 3 वाड्यांतील साडेसात हजार लोकसंख्येसाठी 4 टँकर धावत आहेत.
सध्या पारनेर तालुक्यात टंचाई परिस्थिती अधिक असून या तालुक्यात 36 टँकर सुरू आहेत. संगमनेर तालुक्यात 20, नगर तालुक्यात 15, पाथर्डी तालुक्यात 13, कर्जत तालुक्यात 11, शेवगाव व जामखेड तालुक्यांत प्रत्येकी 4, अकोले तालुक्यात 3 तर नेवासा तालुक्यात एक टँकर सुरू आहे.