गोरक्ष शेजूळ
नगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ठरावाच्या यादीत अनेक नवे चेहरे पहायला मिळणार आहेत. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजपा प्रदेशचे डॉ. सुजय विखे पाटील, खा. नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. किरण लहामटे, आ. अक्षय कर्डिले, प्रतापसिंह पाचपुते, सचिन जगताप अशा अनेक नावांचे ठराव झाल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘यंग ब्रिगेड’ मैदानात दिसण्याचे संकेत आहेत.
पूर्वी शेतकऱ्यांची समजली जाणारी जिल्हा बँक आता साखर सम्राटांची म्हणून संबोधली जात आहे. जिल्हा बँकेसाठी वि.का. सोसायटी, शेतीपूरक संस्था तसेच बिगर शेती अर्थात पतसंस्था, बँकीग इत्यादीतून ठराव मागावण्यात आले होते. यामध्ये पहिल्यांदाच कर्जत तालुक्यातील नांदगाव सोसायटीतून विधानपरिषदेचे सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा ठराव घेण्यात आला आहे.
तसेच प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांचाही ‘विकास सोसायटी’ मतदार संघातुनही ठराव असल्याचे कार्यकर्त्यांकडून समजते. खा. नीलेश लंके यांचाही पारनेर तालुका वि.का. सोसायटीतून ठराव आहे, बनपिंप्रीतून सचिन जगताप, हर्ष अरुण तनपूरे आदींचे ठराव आहेत.
तर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे तीनही मतदार संघातून ठराव आहेत. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार शंकरराव गडाख, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार वैभव पिचड, राजेंद्र नागवडे, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, अमित भांगरे, दत्ता पानसरे आदी दिग्गजांच्या नावाचेही ठराव असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजले आहे.
कुठे संचालकांचे अपहरण, कुठे सचिव पळवणे, कोरमअभावी सभा तहकूब करणे, सभा उधळून लावणे, घोडेबाजार करून संचालक फोडणे, अगदी अधिकाऱ्यांना लाच देणे, एकमेकांवर पोलिसात गुन्हा दाखल करणे, अशा अनेक धक्कादायक घटनानंतर अखेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीची ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली.
वृत्त लिहीपर्यंत 14 तालुक्यांतून सोसायटी, शेतीपूरक आणि बिगरशेती मतदार संघातून सुमारे 3722 ठराव प्राप्त झाले होते. प्रस्तावांची छाननी होऊन प्रारुप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
जिल्ह्याच्या बँकेच्या संचालकांची मुदत संपल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या अध्यक्षतेखाली उपनिबंधक मंगेश सुरवसे, विशेष लेखा परीक्षक वर्ग एकचे गौतम निकाळजे अशी तीन सदस्यीय समिती प्रशासक म्हणून कारभार पाहत आहे.
बँकेच्या निवडणुकीसाठी दि. 17 जून ते काल गुरुवार दि. 16 जुलैपर्यंत ठराव घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील 5890 संस्थांपैकी पात्र संस्थांकडून ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये अनेक गावात राजकारणही तापलेले दिसले. विशेषतः सेवा सोसायटीच्या ठरावावरून झालेला गदारोळ बँकेची निवडणूक किती चुरशीची होणार आहे, याचेच संकेत देणारा ठरला आहे.
जिल्ह्यात 1414 वि.वि.का. सोसायटी आहेत. यातून अवसायानात असलेल्या संस्था वगळता अन्य पात्र सोसायटीमध्ये ठरावासाठी मोठी ओढाताण पहायला मिळाली. तालुक्याच्या नेत्यांनी, तसेच ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनीही आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना रसद पुरवल्याचे दिसले.
पारनेर तालुक्यात संचालकांची पळवापळवी झाली. या ठिकाणी भाजपा सरचिटणीस असलेल्या व्यक्तीने ‘लोणी हवेली’च्या ठरावासाठी आपल्या संचालक बंधुचे विरोधकांनी अपहरण केल्याची थेट पोलिसात फिर्याद दिली. काही तालुक्यात राजकीय दबावतंत्राव्दारे बैठकीच्या काल शेवटच्या दिवशीच सचिवाची पळवापळवी झाली. काही ठिकाणी सचिव नॉटरिचेबल झाले.
त्यामुळे सभाच होऊ शकल्या नाहीत. याबाबत तालुक्याच्या सहायक निबंधकांकडे धाव घेत सचिव बदलून मिळण्याचाही आग्रह दिसला, काही ठिकाणी ठरावाचे ‘मूल्य’ ओळखून सत्ताधाऱ्यांतच दोन गट पडले.
कुठे घोडेबाजार होऊन संचालकांची फोडाफोडी करत ठराव ‘विकत’ घेतला, काही ठिकाणी तालुक्याच्या नेतृत्वाकडून हस्तक्षेप करून इच्छुकांना थांबवून ‘जवळचे’ लोकांच्या नावे ठराव घेतले गेले, काही राजकीय नेत्यांनी आपल्याच नावे तीन-तीन ठराव घेतले, त्यामुळे संस्थेचे संचालकही दुखावल्याचे कानावर आले, कर्जतमध्ये तर संचालक मंडळाने केलेल्या ठरावावर आक्षेप घेतलेला तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यालाच 10 हजाराची लाच दिली गेली, अशा अनेक घटनांनी ही ठरावाची प्रक्रिया चर्चेत राहिली.
ठराव नसला तरी उमेदवारी शक्य?
जिल्हा बँकेच्या 21 जागा आहेत. यात दोन महिला, एक ओबीसी, एक भटक्या विमुक्त आणि अनुसूचित जाती जमाती अशा पाच जागा राखीव आहेत. या जागांवर उमेदवारी करण्यासाठी कोणताही ठराव गरजेचा नाही. मात्र ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे, ते उमेदवार हे ज्या संस्थांचे सभासद आहेत, त्या संस्था बँकेच्या सभासद असणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे संबंधित पाच जागांवर निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही ठरावाची गरज नसल्याचे जाणकार सांगतात.
‘संगमनेर’च किंगमेकर?
जिल्ह्यात पारनेरसह अंदाजे 3700 मतदार असतील. यात सर्वाधिक 852 मतदार हे संगमनेर तालुक्यात आहेत. त्याखालोखाल कोपरगाव 439, नगर 365, श्रीगोंदा 331 या तालुक्यात मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या निवडणुकीत या चार तालुक्यांतील राजकीय समिकरणांकडे लक्ष असणार आहे.
‘त्या’ संस्थांना अखेर कुलूप?
शेतीपूरक अनेक संस्था कागदोपत्री जिवंत अन् फक्त ठराव आणि मतदार यासाठीच कार्यरत असल्याने निवडणुकीत ही मते निर्णायक ठरत होती. हीच बाब निदर्शनास आल्याने अशा निष्क्रीय संस्थांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी सुरू होती. त्यामुळेच जिल्ह्यात 2137 संस्था असताना निवडणुकीसाठी सक्रिय असलेल्या 947 संस्था पात्र असणार आहेत.
चंद्रशेखर घुलेंऐवजी आता नरेंद्र पाटील
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांना सहकार कायद्यातील नव्या नियमामुळे निवडणूक लढवता येणार नाही. मात्र, या निवडणुकीत घुले कुटूंबातून ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र पाटील घुले यांच्या नावाचा ठराव देण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे