नगर: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक बिनविरोधासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी एकत्र येत प्रस्थापितांची मोटबांधणी केली. मात्र विस्थापितांच्या भूमिकेमुळे अनेक इच्छुकांनी प्रस्थापितांविरोधात अर्ज दाखल केले. छाननीनंतर सोसायटीच्या १२ जागांसाठी ५७ तर उर्वरित ७ जागांसाठी १८१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोधाची कसरत विखे-थोरातांना करावी लागणार आहे.
अर्ज माघारीसाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत असल्याने तोपर्यंत बँक बिनविरोधाचा कथ्याकूट सुरू राहिल, असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राज्य बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्यासह १३९ इच्छुकांचे अर्ज छाननीत बाद झाले. नाहाटा, मुरकुटे व पाचपुते यांच्या नावे ठराव असलेल्या सोसायट्या या क व ड वर्गात असल्याने त्यांचे अर्ज बाद झाले.
डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनीका राजळे, आ. किरण लहामटे, आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्या अर्जावर विरोधकांनी छाननीवेळी आक्षेप घेतला. मात्र सक्षम पुराव्याअभावी आक्षेप फेटाळून लावण्यात आल्याने विखे,राजळे, लहामटे, जगताप यांचे अर्ज वैध ठरले. माजी मंत्री शंकरराव गडाख नेवाशातून तर रणजितसिंह देशमुख संगमनेर सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे राहिलेल्या सोसायटीच्या १२ जागांसाठी सुमारे ५७ तर अन्य ७ जागांसाठी १८१ असे १९ जागांसाठी २३८ उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. अर्ज माघारीची मुदत २१ ऑक्टोबरपर्यंत असून तोपर्यंत विखे-थोरातांचा बिनविरोधासाठी कस लागणार आहे.
लहामटेविरोधात पिचड जाणार कोर्टात
अर्जावर माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले सोसायटी मतदार संघात आमदार किरण लहामटे यांच्या आक्षेप नोंदवला होता. सहकाराचा अनुभव, सभासदत्व, तज्ज्ञ संचालक प्रमाणपत्र बोगस असल्याचा पिचडांचा आरोप होता. मात्र लहामटे यांनी संबंधित संस्थेचा पुरावा जोडलेला पुरावा ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पिचड यांचा आक्षेप फेटाळला. परिणामी लहामटे यांचा अर्ज वैध ठरला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात वैभव पिचड हे न्यायालयात अपील करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कोपरगावाचे कदम, शिंदेंचे अर्ज बाद
कोपरगाव सोसायटी मतदारसंघात आमदार विवेक कोल्हे, बिपीन कोल्हे व संजय शिंदे, अनिल कदम असे चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील अनिल कदम आणि संजय शिंदे यांचे अर्ज छाननीत सूचकांच्या स्वाक्षऱ्यासह त्रुटींमुळे बाद करण्यात आले. त्यामुळे आता येथून कोल्हे पिता-पुत्राचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. कोल्हे कुटुंबातून पिता किंवा पूत्र दोघांपैंकी एक बिनविरोध होण्याची औपचारिकता बाकी आहे.
आ. मोनीका राजळेंचा अर्ज वैधच!
वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या थकबाकी, सलग दोन टर्म आणि वेगवेगळ्या संस्थेचे प्रतिनिधीत्व यामुळे आ. मोनिका राजळे यांच्या पाथर्डी सोसायटी मतदारसंघातील उमेदवारीवर कडूचंद शेटे यांनी आक्षेप घेतला. सुनावणीत आ.राजळे यांच्यावतीने ‘बँकेची व्यक्तीगत थकबाकी नसल्याचे पत्र सादर करण्यात आले. ते ग्राह्य धरत शेटे यांचा आक्षेप फेटाळून लावण्यात आला.