Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत थोरात-विखे सहमती एक्सप्रेस; १० जागा बिनविरोध, १० जागांसाठी २६ उमेदवार

दत्ता पानसरे, सचिन घुमरे बिनविरोध; खासदार नीलेश लंके यांचे निवडणूक यंत्रणेवर आक्षेप, परिवर्तन आघाडीचे सात उमेदवार रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

नगर: अर्ज माघारीत शेवटच्या टप्प्यात थोरात-विखे सहमती एक्सप्रेसने जिल्हा बँकेच्या १० जागा बिनविरोध करत बहुमताच्या दिशेने पाऊल टाकले. मंत्री विखे पाटील समर्थकाच्या माघारीने जामखेड सोसायटी मतदारसंघात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे समर्थक सचिन घुमरे बिनविरोध झाले, पण शिंदेंनी तीन अपक्षांना निवडणूक मैदानात उतरवले. खासदार नीलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या युतीने परिवर्तनाची हाक देत सात जागांवर उमेदवार दिले. आता १० जागांसाठी २६ उमेदवार बँक निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोधासाठी एकत्र आलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्किट हाऊसला घेतलेल्या बैठकीत सभापती प्रा. राम शिंदे यांना सामावून घेतले, पण जागावाटपात मात्र डावलले. सभापती शिंदे यांनी कर्जतमधून ज्योती शिंदे, जामखेडमधून सचिन घुमरे, ओबीसीतून आदिनाथ हजारे, महिला राखीवमधून मंजूषा गुंड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर जामखेड वगळता तीन ठिकाणी विखे-थोरात युतीने उमेदवार उतरवले. जामखेड सोसायटी मतदारसंघातून सुधीर राळेभात यांच्या माघारीने शिंदे समर्थक सचिन घुमरे अखेरच्या क्षणी बिनविरोध झाले. कर्जतमधील जागाही बिनविरोध होण्याची अपेक्षा सभापती शिंदे यांना होती, मात्र तुषार राळेभात यांनी माघारीस नकार दिल्याने कर्जतमध्ये शिंदे आणि विखे समर्थकांना सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.

अकाले तालुक्यातील नेत्यांनी मात्र सवतासुभा मांडत विखे-थोरात आणि लंके-लोखंडेच्या पॅनलमध्ये न जाता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. अकोले सोसायटी मतदारसंघात बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांची कन्या संजीवनी शिंदे यांच्या विरोधात आ. किरण लहामटे उमेदवारी करत आहेत. प्रस्थापितांनी कात्रजचा घाट दाखवल्याने दुखावलेले खासदार नीलेश लंके यांनी शिवसेनेची मदत घेत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासोबत युती करत परिवर्तनाची हाक दिली. या युतीचे सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात पारनेर सोसायटी मतदारसंघातून स्वत: नीलेश लंके मैदानात आहेत.

सभापती शिंदेंविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार

कर्जत सोसायटी मतदारसंघातील ४५ मतदार राज्याबाहेर सहलीवर आहेत. सभापती राम शिंदे यांनी या मतदारांसमवेत फोटो काढून तो समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याकडे लक्ष वेधत तुषार पिसाळ यांनी सभापती शिंदे यांच्याविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मतदार पळवल्याचा आरोप करत आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदवली.

निवडणूक यंत्रणेवर खा. लंकेंचे आक्षेप

जिल्हा बँकेत अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत ९ जागा बिनविरोध झाल्याची चर्चा असताना, दुसऱ्या दिवशी मात्र ११ जागा बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. अर्ज माघारीची मुदत दुपारी तीनपर्यंत होती. मात्र अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यत माघार अर्ज घेतल्याचा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला. लंके यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी ते बंद असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर खा. लंके यांनी नाराजी व्यक्त केली. आता मतदान केंद्रासह मतपेट्यांवर लक्ष ठेवण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. ॲड. सुरेश लगड यांनीही माघारीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली.

दत्ता पानसरे, सचिन घुमरे बिनविरोध

अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणी श्रीगोंद्यातून आ. विक्रमसिंह पाचपुते यांचे बंधू प्रतापसिंह आणि जामखेडमधून सुधीर राळेभात यांनी माघार घेतली. त्यामुळे येथून दत्ता पानसरे व सचिन घुमरे यांच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला. गत विधान परिषद निवडणुकीवेळी प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी दत्ता पानसरे यांनी माघार घेतली होती, त्यामुळे दत्ता पानसरे यांच्या बिनविरोधासाठी डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांनी प्रयत्न करत विधान परिषदेच्या माघारीची परतफेड बिनविरोधाने केल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT