नगर: जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकारातील मातब्बर एकवटले असतानाच शिवसेनेने ताकदीने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या या निर्णयामुळे अहिल्यानगरमध्ये महायुतीला तडा गेल्याचे मानले जाते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी मंगळवारी आमदार प्राजक्त तनपुरे (सोसायटी), माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड (महिला राखीव) आणि धनलक्ष्मी अजिनाथ हजारे (बिगरशेती) या तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. राहुल जगताप यांच्यानंतर गुंड व हजारे यांच्या उमेदवारी अर्जामागे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.
माजी आमदार राहुल जगताप, मंजूषा गुंड व धनलक्ष्मी हजारे या तिघांचे अर्ज दाखल झाल्याने शिंदे यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढल्याचे मानले जाते. बँक बिनविरोधसाठी प्रत्यक्षात चर्चा होईल, त्या वेळी स्वत:सह सभापती शिंदे यांच्याकडून चार जागांवर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. संगमनेरातील समझोता बैठकीपासून शिवसेनेला बाजूला ठेवण्यात आले होते. त्यानंतर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, प्रशांत लोखंडे, सुजीत झावरे, सिद्धार्थ मुरकुटे यांच्यासह प्रमुख शिवसेना नेत्यांची मंगळवारी अहिल्यानगरमध्ये बैठक झाली. त्यात बँक निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. खासदार नीलेश लंके व राम शिंदे हेही बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे बँक खरेच बिनविरोध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यानंतरच्या दोन दिवसांत दाखल झालेले चार उमेदवारी अर्जांमागे सभापती शिंदे यांना दुर्लक्षून चालणार नाही, हेच स्पष्ट होत आहे.
नव्या समीकरणांची चाचपणी?
बँकेच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. थोरात-विखे हे तुल्यबळ गट एकत्र आल्यानंतरही, प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड) यांच्यासह नीलेश लंके (पारनेर), राहुल जगताप (श्रीगोंदा), प्रताप ढाकणे (पाथर्डी), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर), वैभव पिचड (अकोले), विठ्ठलराव लंघे (नेवासा), अमोल खताळ (संगमनेर) आदींच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष आहे.
विखे-पिचडांचा मोबाईल कॉल
अकोले सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते सीताराम गायकर यांच्या बाजूने बहुतांश ठराव असल्याची चर्चा आहे. याच तालुक्यातून माजी आमदार वैभव पिचड हेदेखील ‘सोसायटी’तूनच आग्रही असल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, संगमनेरातील बैठकीची माहिती नव्हती, मात्र बैठक संपल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी संपर्क केल्याचे वैभव पिचड यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
बिगरशेतीत जगताप की गायकवाड?
बिगरशेती मतदारसंघातून प्रशांत गायकवाड यांच्यासाठी आमदार काशीनाथ दाते आग्रही आहेत. याच जागेवर आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हेही दावेदार आहेत. एकाच जागेवर राष्ट्रवादीतील दोन तुल्यबळ उमेदवार दावा करत असल्याने त्यांच्यात कसा तोडगा निघतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. दरम्यान, प्रशांत गायकवाड बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. ही सुंदोपसुंदी सुरू असतानाच प्रा. राम शिंदे समर्थक धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांनीही बिगरशेतीतूनच अर्जही दाखल केला आहे.
शिंदेंकडून मतदारांची ‘विशेष’ काळजी
संगमनेरातील बैठकीनंतर राम शिंदे हे अलर्ट मोडवर आले आहेत. जामखेड सोसायटी मतदारसंघातून दगाफटका नको, म्हणून ठराव असलेल्या मतदारांची सभापती शिंदे यांच्याकडून विशेष काळजी घेतली जात आहे. चोंडी येथील निवासस्थानी त्यांनी सर्व मतदारांची बैठक घेतली. त्याचा फेसबुकवर पोस्ट केलेला फोटो चर्चेत आहे. हे मतदार सहलीला गेल्याचेही सांगण्यात आले.
थोरातांची भूमिका अनाकलनीय
दोन दिवसांपूर्वी संगमनेरात जी समझोता बैठक झाली, त्यासाठीचे फोन बाळासाहेब थोरात यांच्या यंत्रणेकडून फिरले होते. ज्यांना निरोप मिळाले नाहीत, ते नाराजीचा सूर आळवत असून ‘थोरातांची भूमिका अनाकलनीय’ असल्याचे म्हणत आहेत. ‘आम्ही सोबत राहिलो असतो; पण आता नाही,’ असे म्हणत ते बंडाचे निशाण फडकावण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, डॉ. सुजय विखे पाटील दिल्लीत असून तेथून परतल्यानंतरच ते बँकेच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. नाराजांची समजूत काढण्याची भूमिका त्यांना बजावावी लागणार आहे.
दोन दिवसांत ५३१ इच्छुक
बँकेच्या 2021च्या निवडणुकीवेळी 130 इच्छुकांनी साधारणतः 650 उमेदवारी अर्ज नेले होते. यापैकी 310 अर्ज दाखल झाले होते. या वेळी मात्र परिस्थिती वेगळी दिसते आहे. पहिल्या दिवशी 361 आणि दुसऱ्या दिवशीही तब्बल 170 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणूक प्रक्रियेत शिवसेनेला बाजुला ठेवले जात असेल, अन् विचारात घेणार नसाल तर ताकदीने बँकेची निवडणूक लढवू.रामभाऊ रेपाळे, संपर्क प्रमुख, शिवसेना