Ahilyanagar District Bank Election Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत आक्षेपांचा पाऊस; विखे, राजळे, लहामटे, जगतापांचे अर्ज धोक्यात?

बनावट स्वाक्षरी, थकबाकी आणि सहकारातील अनुभवावरून हरकती; आज निकाल, पात्र उमेदवारांची यादी होणार जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत छाननीवेळी डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिका राजळे, आ. किरण लहामटे व माजी आमदार राहुल जगताप यांच्या अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आला. दरम्यान संगमनेर, कोपरगाव आणि राहातामधील उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जावर सुचकाच्या बनावट सह्यांचाही आरोप झाला. या आरोप प्रत्यारोपाची सुनावणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. आज बुधवारी (दि.७) त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय देणार आहेत. त्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ३७२ पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याची मंगळवारी (दि.६) छाननी झाली. बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, आमदार किरण लहामटे, वैभव पिचड, जालिंदर वाकचौरे, प्रतापसिंह पाचपुते, घनश्याम शेलार, बी. जे. देशमुख, रणजितसिंह देशमुख, गंगाधर सांगळे, करण ससाणे, अरूण कडू, अमृत धुमाळ छाननीवेळी उपस्थित होते.

साखर कारखान्यांकडील थकबाकीच्या मुद्द्यावरून डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनीका राजळे, राहुल जगताप-प्रणोती जगताप यांच्या अर्जावर विरोधकांकडून आक्षेप नोंदविण्यात आले. सहकारातील अनुभव नसल्याने आमदार किरण लहामटे यांचा अर्ज बाद करण्याची मागणी वैभव पिचड यांनी केली. संगमनेर, राहाता आणि कोपरगावातून सूचक, अनुमोदकांच्या सह्या बनावट असल्याचे आक्षेप आले. त्यामुळे काल बँकेचे राजकारण तापलेले दिसले. दरम्यान, सर्व आक्षेपांवर रात्री उशीरापर्यंत सुनावणी सुरू होती. आज बुधवारी निकालानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रस्थापित आणि विस्थापितांमध्ये आता अर्ज बाद करण्यासाठीही राजकीय डावपेच खेळल्याचे छाननीवेळी दिसून आले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर, रावसाहेब खेडकर यांच्यासमोर मतदार संघनिहाय छाननीची प्रक्रिया सुरू झाली. त्यावर आलेल्या हरकतींवर दुपारी चार वाजेनंतर स्वतंत्र सुनावणी झाली, ती उशिरापर्यंत सुरू होती. हकरतींच्या सुनावणीवरील निकाल राखून ठेवण्यात आला असून, तो आज बुधवारी जाहीर केला जाणार आहे.

डॉ. सुजय विखेंवरील आक्षेप

डॉ. बा.बा. तनपुरे साखर कारखान्यावर सुजय विखे हे तज्ज्ञ संचालक होते. त्या कारखान्याकडे जिल्हा बँकेची थकबाकी असून संचालकांनी कर्जाची हमी जिल्हा बँकेला दिलेली आहे. ते कर्ज थकीत गेल्याने विखे हे थकबाकीदार असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा, अशी मागणी एकनाथ घोगरे यांच्यावतीने ॲड. सुरेश लगड यांनी केली.

डाॅ. विखेंचा युक्तिवाद

जिल्हा बँकेने कर्ज हे साखर कारखान्याला दिलेले आहे. कर्ज कारखान्याकडे थकीत आहे. सुजय विखे पाटील यांच्याकडे वैयक्तिक थकबाकी नाही. त्यामुळे घोगरे यांचा आक्षेप फेटाळून डॉ. सुजय विखे पाटील यांचा अर्ज कायम ठेवण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. विनायक होन यांनी केला.

एकनाथ घोगरेवरील आक्षेप

एकनाथ घोगरे यांनी उमेदवारी अर्जात दिलेच्या एका सूचकाची स्वाक्षरी खोटी असल्याचा आक्षेप सुजय विखे यांच्यावतीने वकिलांनी मांडला. तशी कबुली सुचकाने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दिली. विखेंच्यावतीनेही तसे पुरावेही देण्यात आले.

घोगरेंचा युक्तिवाद

तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात, तुम्ही सहीची पडताळणी का केली नाही. ती आता करावी. दबावापोटी सुचकाने घुमजाव केले. विखेंच्यावतीने घेतलेला आरोप हा खोटा असून तो फेटाळण्यात यावा.

किरण लहामटेंवरील आक्षेप

सहकारात एक वर्ष व्यावस्थापकीय अनुभवाची अट आहे. तो अनुभव किरण लहामटे यांच्याकडे नाही. अर्जासोबत अनुभवाचे जोडलेले प्रमाणपत्र बनावट आहे. त्यामुळे लहामटे यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांच्यावतीने वकिल अमोल धोंडे यांनी मांडली.

लहामटे यांचा युक्तिवाद

लहामटे हे दैवत सहकारी संस्थेचे तज्ज्ञ संचालक असून तेथे कार्यरत आहेत. तसे अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडलेले आहे. विरोधकांचा आक्षेप खोटा असून तो फेटाळण्यात यावा.

आ. राजळेंवरील आक्षेप

आ. मोनिका राजळे यांच्या नेतृत्वातील वृध्देश्वर साखर कारखान्याकडे जिल्हा बँकेची थकबाकी आहे. जिल्हा बँकेत दोन वेळेस त्या संचालक होत्या. आणखी दोन संस्थेत त्या संचालक आहेत. अर्जासोबत थकबाकी नसल्याचा जिल्हा बँकेचा दाखला जोडलेला नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा, अशी मागणी कडूचंद शेटे यांच्यावतीने वकिल गोरख पालवे यांनी केली.

राजळेंचा युक्तिवाद

जिल्हा बँकेचे थकबाकी नसून ते नियमीत कर्ज आहे. शिवाय ते साखर कारखान्याकडे आहे, वैयक्तिक नाही. आमदार मोनिका राजळे यांनी अर्जासोबत वैयक्तिक थकबाकी नसल्याचा दाखला जोडलेला आहे त्यामुळे विरोधकांनी नोंदविलेला आक्षेप फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद आमदार राजळे यांच्यावतीने ॲड. काळे यांनी केला.

प्रणोती व राहुल जगतापांवरील आक्षेप

राहुल जगताप हे कुकडी साखर कारखान्याचे चेअरमन तर प्रणोती जगताप हे संचालिका आहेत. कारखान्याकडे जिल्हा बँकेची थकबाकी असून कारखाना बँकेने जप्त केला आहे. कर्जापोटी जगताप यांनीच मॉरगेज करून दिलेले आहे. त्यामुळे राहुल जगताप व प्रणोती जगताप हे थकबाकीदार असून त्यांचे अर्ज बाद करावे, असा आक्षेप प्रतापसिंह पाचपुते यांच्यावतीने ॲड. गोरक्ष ढेरे यांनी नोंदवला.

जगताप यांचा युक्तिवाद

जिल्हा बँकेची थकबाकी ही साखर कारखान्याकडे आहे. कारखाना ही संस्था आहे. संस्था थकबाकीत जावू शकते. जगताप हे स्वत: थकबाकीदार नाहीत. जिल्हा बँकेची कोणतीही बाकी नसल्याचा दाखला अर्जासोबत जोडलेला आहे. त्यामुळे विरोधकांचा आक्षेप चुकीचा असून तो फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद राहुल जगताप व प्रणोती जगताप यांच्यावतीने ॲड. वाळके यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT