Ahilyanagar District Bank Election Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: नगर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगुल वाजणार! प्रारूप मतदार यादी आज जाहीर

३१ ऑगस्टपर्यंत हरकती; १५ सप्टेंबरला अंतिम यादी, विखे-शिंदेंच्या हालचालींनी राजकीय गणिते रंगली

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आज बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत त्यावर हरकती घेता येणार असून त्या निकाली काढल्यानंतर १५ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. मतदार यादीचा कार्यक्रम विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी जाहीर केला.

मतदारयादी जाहीर होताच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या लगीनघाईत वऱ्हाडी कोण कोण याची चर्चा सुरू झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारीतच संपली आहे. १७ जून ते १६ जुलै दरम्यान मतदार यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ठराव मागविण्यात आले होते.

बँकेकडे ५८९० सभासद संस्था असल्या तरी अनेक संस्था अपात्र असल्याने ठराव कमी आले. सोसायटीच्या १४१४ संस्थांपैकी १३६७ ठराव आले होते. बिगरशेती संस्था साधारणतः २३३८ च्या आसपास होत्या, पैकी १५१८ ठराव सहकार विभागाकडे आले होते, तर शेतीपूरक २१३९ संस्थांपैकी केवळ २४३ ठराव आल्याची चर्चा होती. हे ठराव विभागीय सह निबंधकांकडे पाठवले असून त्यावरून प्रारूप मतदार यादी झाली आहे.

१ जून २०२६ अर्हतेवर मतदार यादी

कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था, प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बिगर शेती संस्था मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. बँकेच्या जिल्हा मुख्यालयासह तालुका विकास अधिकारी आणि सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ही यादी पहाण्यास उपलब्ध असणार आहे. बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर करताना १ जून २०२६ ही अर्हता ग्राह्य धरण्यात आली आहे.

विखे, शिंदे ॲक्टीव्ह

पक्षीय जोडे बाजुला काढत जिल्हा बँकेचे राजकीय गणिते आखली जातात. बँकेचा आजपर्यंतचा इतिहास पाहता विखे विरोधात सगळे असे राजकीय समीकरण पहावयास मिळाले. आता राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून पालकमंत्रीही आहेत. भाजपचेच नेते विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही जिल्हा बँकेच्या राजकीय मैदानात उडी घेत जुळवाजुळव सुरू केली आहे. प्रा. शिंदे व मंत्री विखे पाटील दोघांनीही स्वंतत्रपणे जिल्ह्याच्या सहकारातील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे मात्र अजूनतरी ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोण नेते कोणाच्या पॅनलमध्ये दिसणार याची उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT