Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

District Bank Draft Voter List: जिल्हा बँकेच्या मतदारयादी आज की सोमवारी? उत्कंठा वाढली; ‘प्रारूप’कडे इच्छुकांच्या नजरा

बँकेकडे एकूण 5890 सभासद संस्था असल्या तरी अनेक संस्था अपात्र असल्याने ठराव कमी आले.

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा बँकेची प्रारुप मतदारयादीची प्रतीक्षा आता संपणार आहे. कदाचित आज (शुक्रवारी) किंवा सोमवारीच ही यादी प्रसिद्ध होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, दिवाळीपूर्वीच बँकेचे फटाके फुटण्याची शक्यताही वर्तवली जात असून, त्या धर्तीवरच व्यूहरचनांना वेग आल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत ही फेब्रुवारी 2026 रोजी संपली आहे. त्यानंतर दि. 17 जून ते 16 जुलै दरम्यान मतदार यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ठराव मागविण्यात आले होते. त्यानुसार बँकेकडे एकूण 5890 सभासद संस्था असल्या तरी अनेक संस्था अपात्र असल्याने ठराव कमी आले.

सोसायटीच्या 1414 संस्थांपैकी 1367 ठराव आले होते. बिगरशेती संस्था ह्या साधारणतः 2338 च्या आसपास होत्या, पैकी 1518 ठराव सहकार विभागाकडे आले होते, तर शेतीपूरक 2139 संस्थांपैकी केवळ 243 ठराव आल्याची चर्चा होती.

त्यामुळे पडताळणीनंतर 3100 ते 3200 च्या आसपास पात्र सभासद असू शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. यामध्ये संस्था अवसायानात असणे, नोंदणी रद्द होणे, शासकीय शुल्क न भरणे, अशा संस्था मतदानासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत.

ठरावाची पडताळणी झाली, ते नाशिकला सहनिबंधक यांच्याकडे पाठविण्यात आले. तेथूनच आता प्रारूप मतदारयादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आठवड्यापासून ही यादी नेमकी कधी जाहीर होणार, याकडे नजरा लागलेल्या आहेत. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती व सुनावणीची प्रक्रिया घेतली जाणार आहे.

राष्ट्रवादीही तयार; ‘मविआ’ कुठंय?

तिकडे राष्ट्रवादीच्या नगरच्या नेत्यांनी मुंबईत जाऊन सुनेत्रा पवार यांच्याकडे वाटाघाडीमध्ये बँकेच्या अध्यक्ष पदावर मात्र आपला दावा कायम असावा, अशी मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांनीही सहा सदस्यांची समिती नियुक्त करत बँकेत राष्ट्रवादी ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. घुले आणि गायकर यांच्याकडे प्रमुख जबाबदारी दिल्याचेही सूत्र सांगते.

याशिवाय शिवसेनेकडून भानुदास मुरकुटे हेही राम शिंदे यांच्यासोबत जुळवून घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, महायुती ॲक्टीव्ह मोडवर दिसत असली तरी महाविकास आघाडीत मात्र सन्नाटा आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बँकेबाबत निवडणूक लागल्यानंतर भूमिका जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. गडाखही शांत आहेत. त्यामुळे ही निवडणूक नेहमीप्रमाणेच ‘राजकीय सोय’ आणि ‘सोयरे-धायरे’ पॅटर्न या समीकरणांवर, मात्र विखे-थोरात-शिंदे अशा गटांमध्ये रंगणार असल्याचे स्पष्ट आहे.

‘डिनर डिप्लोमसी’ ते ‘वेट ॲण्ड वॉच’!

जिल्हा बँकेच्या आखाड्यात यंदा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उडी घेतली आहे. राजळे, गडाख, तनपुरे, खेमनर, फाळके, कोल्हे अशा सहकारातील अनेक दिग्गज नेत्यांच्या घरी त्यांनी भेटी दिल्या.

जिल्हा बँकेची चर्चा करतानाच स्नेहभोजनही घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे शिंदेंची ‘डिनर डिपलोम्सी’ चर्चेचा विषय ठरली आहे. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासह पांडुरंग अभंग, भानुदास मुरकुटे यांच्याशीही बँकेबाबत चर्चा केल्याचे दिसले.

दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जिल्ह्यात लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. खरे तर त्यांना कोणतीही नव्याने जुळवाजुळव करण्याची गरज नाही. प्रत्येक तालुक्यात विखेंना मानणारा गट आहेच.

याशिवाय सर्वपक्षीय नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. श्रीगोंद्यातील पाचपुते-नागवडेंचे मनोमिलन असेल किंवा राहुरीत तनपुरे-कर्डिलेंची दिलजमाई, असा सर्वच तालुक्यांत त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या नेतृत्वातील ‘समझोता एक्सप्रेस’मध्ये कोण कोण बसणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. सध्यातरी त्यांची भूमिका ‘वेट ॲण्ड वॉच’चीच दिसते. डॉ. सुजय विखे पाटील यांनीही जिल्हा बँकेबाबत ‘योग्य वेळेची’ वाट पाहणे पसंत केल्याचे कार्यकर्ते सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT