Ahilyanagar Dengue Free Campaign Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Dengue Free: अहिल्यानगर ‘डेंगूमुक्त’ करण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये; घरोघरी पाणीसाठ्यांची तपासणी

‘डेंगूमुक्त अहिल्यानगर’ उपक्रमाचा सहावा आठवडा; स्वच्छतेसाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आयुक्तांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेच्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य सुविधा तसेच औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. पावसाळ्यामध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. हे आजार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून आणि परिसरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार पसरण्याची शक्यता असताना अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर’ साप्ताहिक उपक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात घरोघरी जाऊन पाणीसाठ्यांची तपासणी तसेच डेंगू आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, नगरसेवक मनोज कोतकर, दत्ता गाडळकर, मयूर बांगरे, नगरसेविका पौर्णिमा गव्हाळे, शिक्षणाधिकारी जुबेर पठाण, मुख्याध्यापक विजय हिंगे, डॉ. एच. आर. मुजुमदार, प्रशांत जाधव, वृषाली आरु, विनय शेळके, प्रभाग अधिकारी सतीश पुंड, योगेश औटी आदी उपस्थित होते. दरम्यान, आयुक्त यशवंत डांगे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत जनजागृती केली.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागाने आरोग्य सेवांच्या बाबतीत चांगले काम केल्यामुळे राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. या कामामध्ये सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शहरात डेंगू आजाराबाबत चांगल्या पद्धतीने जनजागृती होत असून, त्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे यासाठी महापालिका प्रशासन काम करीत असून, नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहेत.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डेंगू आजाराबाबत पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. डेंग्यू प्रतिबंधासाठी स्वच्छता, पाणीसाठे टाळणे व नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे जनजागृती केली.

डेंगूमुक्त अहिल्यानगरसाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून, प्रत्येकाने आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करून डेंग्यू प्रतिबंधाच्या उपाययोजनांमध्ये सहभागी व्हावे.
यशवंत डांगे, आयुक्त
साथीचे आजार पसरू नयेत यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून घराच्या परिसरात पाणी साठू न देता परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे गरजेचे आहे.
गीतांजली काळे, नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT