शिर्डी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्हा भविष्यात देशाच्या संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल. देशाच्या संरक्षण क्षेत्रात प्रगती साध्य करणाऱ्या गणेश निबे यांच्या उद्योग समूहाचे यात महत्त्वपूर्ण योगदान राहील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये निबे समूहाने विकसित केलेल्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या कामाची औपचारिक सुरुवात मंत्री डॉ. विखे पाटील व सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी महंत बापूजी, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, नगराध्यक्ष जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह निबे उद्योग समूहाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, की निबे समूहाने संरक्षण उत्पादनात घेतलेली झेप कल्पनाशक्तीच्या पलीकडील आहे. औद्योगिक वसाहतीत जागा उपलब्ध झाल्यानंतर केवळ एका वर्षात 12 लाख चौरस मीटर आकाराचे शेड उभारून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणे, हे देशातील पहिलेच उदाहरण ठरले आहे. गणेश निबे यांनी जिद्द व मेहनतीने निर्माण केलेली ही ओळख सर्वांसाठी अभिमानाची आहे.
शिर्डीला जसा आध्यात्मिक वारसा आहे, तशीच आता संरक्षण उत्पादनाची भूमी म्हणूनही ओळख निर्माण होईल. शिर्डी विमानतळ, रेल्वे स्टेशन व आता संरक्षण प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट होत आहे. या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून, स्थानिक भूमिपुत्रांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 15 दावोस येथील परिषदेत झालेल्या गुंतवणुकीच्या करारांमुळे अहिल्यानगर जिल्ह्याला मोठी संधी मिळाली आहे, असे सांगत मंत्री विखे पाटील यांनी याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.
उद्योजक गणेश निबे म्हणाले, अवघ्या नऊ महिन्यांत झालेले प्रकल्पाचेे काम पाहण्यासाठी मार्च महिन्यांत पाचही सैन्यदलांचे प्रमुख येथे येणार आहेत. आपला देश संरक्षण उत्पादने निर्यात करत असून, कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक उत्पादन क्षमता देशात निर्माण झाली आहे. आमदार आशुतोष काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
राजपथावरील संचलनात ‘निबे’चे रॉकेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेमुळेच निबे उद्योग समूह जागतिक स्तरावर पोहोचला आहे. समूहाने स्वतःचा उपग्रह विकसित करण्याचे काम हाती घेतले असून, यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनात निबे समूहाने विकसित केलेले रॉकेट समाविष्ट असणार आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.