Bhandardara Pudhari
अहिल्यानगर

Bhandardara Dam Water Level: नगर जिल्ह्यात धरणसाठा घटला; भंडारदरा धरणात 31 टक्के पाणीसाठा

पावसाअभावी सरासरी 25 टक्केच धरणसाठा शिल्लक; गेल्या वर्षीच्या तुलनेत 39 टक्के घट, खरीप पेरण्या खोळंबल्या

पुढारी वृत्तसेवा

नगर: पावसाळा सुरू होऊन पाच आठवडे उलटले; परंतु अद्याप धरणांच्‍या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला नाही. मात्र, भंडारदरा धरण परिसरात मध्‍यम स्‍वरूपाचा पाऊस सुरू असल्‍याने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. गेल्‍या पाच दिवसांत एक टीएमसी पाण्‍याची आवक भंडारदरा धरणात झाली. उर्वरित धरणांत पावसाअभावी नवीन आवक नाही. आजमितीस धरणांत सरासरी २५ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. याच कालावधीत गेल्‍या वर्षी धरणसाठा ६३.६२ टक्‍के इतका होता.

यंदा ‘अल निलो’चा प्रभाव असल्‍याने यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. याचा प्रत्‍यय जून महिन्‍यात आला. या महिन्‍यात ३९ टक्‍के पावसाची घट झाली. जुलै महिना सुरु झाला. पहिल्‍या पाच दिवसांत सरासरी १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाअभावी अद्याप साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्रावरील खरीप पेरणी खोळंबली आहे.

मुळा, भंडारदरा, निळवंडे, आढळा, सीना आदी धरणांच्‍या पाणलोट क्षेत्रातदेखील मुसळधार होईना. गेल्‍या पाच दिवसांत भंडारदरा परिसरात पाऊस सुरू असल्‍याने, सरासरी दररोज दोन ते अडीचशे दशलक्ष घनफूट इतक्‍या पाण्‍याची भंडारदरा धरणात आवक सुरू आहे. १ जून ते ३० जूनपर्यंत या धरणात १०३ दशलक्ष घनफूट इतकी आवक झाल्‍याची नोंद आहे. १ जुलै ते ५ जुलै दरम्‍यान १०३७ दशलक्ष घनफूट इतकी नवीन आवक झाली. त्‍यामुळे भंडारदरा धरणांतील पाणीसाठा आता ३१.७० टक्‍क्‍यांवर गेला आहे.

जिल्‍हाभरातील लहान-मोठ्या धरणांत सध्‍या फक्‍त १२ हजार ८४० दशलक्ष घनफूट इतका म्‍हणजे २५ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. गेल्‍या वर्षी आजच्या तारखेपर्यंत पाणलोट क्षेत्रांत जोरदार पाऊस सुरू होता. त्‍यामुळे आढळा, सीना धरणे ओव्‍हर फ्‍लो झाली. भंडारदरा ६९ टक्‍के, निळवंडे ६१, मुळा ५८ टक्‍के भरले होते. सरासरी ३२ हजार ५०६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्‍ध होता. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा ३९ टक्‍के पाणीसाठा धरणांत कमी आहे. त्‍यामुळे अजून तरी दुष्‍काळी परिस्थितीचे सावट हटलेले दिसत नाही.

भीमा नदीत विसर्ग

पुणे जिल्ह्यात सध्‍या पावसाचा जोर सुरू आहे. त्‍यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्‍यामुळे भीमा नदीत विसर्ग सोडण्‍यात आला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९ हजार ६९३ क्‍यूसेकने पाणी भीमा नदी पात्रात सोडण्‍यात आले. श्रीगोंदा तालुक्‍यात ही नदी वाहती झाली आहे.

धरणांतील पाणीसाठा

भंडारदरा ३१.७०, निळवंडे १८.८६, मुळा २४.४५, आढळा ३४, मांडओहळ ५.९३, घाटशीळ १६, सीना ३१.३३, खैरी १७.१६, विसापूर १३. (टक्‍के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT