Bhandardara Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Water Crisis: नगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; धरणांमध्ये फक्त २८.६१ टक्के पाणीसाठा

मान्सून लांबल्याने धरण पातळी घसरली; १३४ गावे आणि ७६८ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

पुढारी वृत्तसेवा

नगर: उन्हाळा जवळपास संपत आला असला, तरी ७ जून उगवला, तरी मान्सूनच्या आगमनाची अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यातच जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा १४ हजार ६१८ दशलक्ष घनफूट इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत फक्त हा साठा केवळ २८.६१ टक्के आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मुळा धरणात ३०.२२ टक्के, तर भंडारदरा धरणात २२.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धरणाचे लाभक्षेत्र नसलेल्या जिल्ह्यातील १३४ गावे आणि ७६८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई असून, १२९ टँकरद्वारे अडीच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाने पाठ फिरविल्यास धरणांतील पाणी टँकरसाठी उचलण्याची शक्यताही आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अगोदर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा, सीना तसेच इतर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होती. त्यामुळे रब्बी हंगाम चांगला झाला. मध्यंतरी भंडारदरा धरणांतील लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ऐन मे महिन्यात भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा आदी तालुक्यांतील नदीकाठावरील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

उन्हाळा संपला असतला तरीही अद्याप पावसास प्रारंभ झालेला नाही. पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील लहान- मोठ्या धरणांत आजमितीस फक्त १४ हजार ६१८ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यात सरासरी फक्त २८.६१ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या उन्हाचा तडाखा अद्याप कायम असून, पावसाने ओढ दिल्यास धरणांतील आहे तो पाणीसाठा कमी होणार आहे.

सध्या जिल्हाभरातील भूजलपातळी सरासरी दीड ते पावणेदोन मीटरने खालावली आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका आदी कोरडेठाक झाले आहेत. अशा परिस्थितीत पावसाने पाठ फिरविल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांतील पाण्याचा वापर टंचाई भागातील गावांसाठी करावा लागण्याची शक्यता आहे.

आता ३१ ऑगस्टपर्यंत पाणी राखीव ठेवणार पाणीयोजनांची पाणीकपात मुळा, भंडारदरा, निळवंडे आणि आढळा आदी धरणांतील लाभक्षेत्रावरील अहिल्यानगरसह श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर आदी शहरांसह बहुतांश गावांची पाणीयोजना या धरणांवर अवलंबून आहे. पाऊस लांबल्यास या पाणीयोजनांचे पाणी कपात होण्याची शक्यता आहे.

धरण पाणीसाठा

  • भंडारदरा : २४८२ (२२.४८)

  • निळवंडे : २६२३ (३१.५३)

  • मुळा : ७८५६ (३०.२२)

  • आढळा : ४२७ (४०.८८)

  • मांडओहळ : ५५.४० (१४)

  • घाटशीळ पारगाव : ११० (२५)

  • सीना : ८५३ (३५.५४)

  • खैरी : १११.७३ (२१)

  • विसापूर : १०० (११)

गेल्या वर्षीचा पाणीसाठा ३४ टक्के

गेल्या वर्षी मे महिन्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मे महिन्यात जवळपास २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरणांतदेखील पाणीसाठा वाढण्यास काहीसा दिलासा मिळाला होता. गेल्या वर्षी जिल्हाभरातील धरणांत १७ हजार ४३९ दलघफू इतका म्हणजे ३४.१४ टक्के पाणीसाठा नोंद होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT