नगर: घरात घुसून अपंग महिलेची अज्ञात व्यक्तीने क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धारदार शस्त्राने गळा व हनुवटीवर गंभीर वार करून महिलेला जीवे ठार मारले. शुक्रवारी (दि.12) बोल्हेगावातील कौस्तुभ कॉलनीत घडलेल्या या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मनिषा बाळासाहेब शिंदे (वय 40) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती बाळासाहेब साहेबराव शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मुळ आंचलगाव (कोपरगाव) चे शिंदे यांचे अदिराज इंजिनिअरींग वर्क नावाचे एमआयडीसीत वर्कशॉप आहे. ते बोल्हेगावातील कौस्तुभ कॉलनीत राहतात. मेहुणीच्या पुतण्याच्या साखरपुड्यासाठी बाळासाहेब व त्यांचा मुलगा अनिकेत हे शुक्रवारी सकाळीच विंचूर (निफाड) येथे गेले होते. पत्नी अपंग असल्याने ती सहसा घराबाहेर कोठे जात नाही. त्यामुळे हे दोघेच कार्यक्रमाला मोटारसायकलने गेले.
कार्यक्रम अटोपून दोघे पिता पुत्र मानुरी (येवला) येथे बाळासाहेबांच्या बहिणीकडे गेले. सायंकाळ झाल्याने तेथूनच बाळासाहेब यांनी पत्नी मनिषा हिला फोन लावला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. वारंवार प्रयत्न करूनही फोन न उचलल्याने त्यांनी शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता, संबंधित महिला हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेल्या स्थितीत आढळून आल्या.
आंचलगाव येथे मोटारसायकल लावून शिंदे हे भाऊ, भावजयीसह रात्री कारने बोल्हेगाव येथील घरी पोहचले. घरात पाहणी केली असता फरशीवर रक्ताचे थारोळे, तसेच एक चाकू आणि ब्लेड दिसून आले. महिलेला तातडीने अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बाळासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
दरवाजाला बाहेरून कडी
मनिषा यांच्या हत्येनंतर दरवाजाची बाहेरून कडी लावण्यात आलेली होती. मनिषा यांच्या हनुवटीवर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने कापलेल्या मोठ्या जखमा दिसून आल्या. त्यातून रक्तस्राव झाला होता. घरात चाकू व ब्लेड पडलेले होते. घरात घुसून अपंग महिलेवर हल्ला करत तिला ठार मारल्याने बोल्हेगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलिसांसमोर अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्याचे आवाहन असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.