Ahilyanagar Bhuikot Fort Contract Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Bhuikot Fort: अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा; शासन-लष्कराचा सामंजस्य करार

‘स्वदेश दर्शन २.०’अंतर्गत होणार किल्ल्याचा कायापालट; भव्य प्रवेशद्वार, इंटरप्रिटेशन सेंटर, नेचर वॉकवे, मुक्त नाट्यगृहासह पर्यटन सुविधांना मिळणार गती

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्‍यानगर येथील भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे. किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभाग यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्‍या पाठपुराव्‍याला अखेर यश आले. या करारामुळे किल्ल्याच्या संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित विविध विकासकामांना प्रत्यक्ष गती मिळणार आहे.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याचा विकास करण्याची घोषणा केली होती. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला १७ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली होती.

मात्र, भुईकोट किल्ला लष्कराच्या अखत्यारीत असल्याने प्रत्यक्ष विकासकामे सुरू करण्यासाठी लष्कराची अंतिम परवानगी आवश्यक होती. या प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब झाला. मात्र, अहिल्यानगर येथील लष्कराच्या मुख्यालयात मंगळवारी (दि. १) महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि लष्‍कराच्‍या वतीने अहिल्‍यानगरचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर पी. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी जिल्‍हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील उपस्‍थित होते.

भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या इतिहासातील महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप आणि वास्तूचे महत्त्व जपत पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण केल्‍या जाणार असून, भविष्यात हा किल्ला पर्यटन विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची अपेक्षा आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे झालेल्‍या सामंजस्‍य करारामुळे भुईकोट किल्ल्याचे रूपडे बदलण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडले आहे.

किल्ल्याचा होणार कायापालट

भुईकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करताना पर्यटकांसाठी आधुनिक आणि आवश्यक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यामध्‍ये किल्ल्यासाठी भव्य प्रवेशद्वार, वाहनतळ आणि स्वच्छतागृहांचा समावेश आहे. तटबंदीचे संवर्धन करून पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास व वास्तूचे महत्त्व समजावे यासाठी इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. बुरुज क्रमांक १ ते ११ पर्यंत १३७० मीटर लांबीचा नेचर वॉकवे प्रस्तावित आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुक्त नाट्यगृह उभारले जाणार असून, परिसरात सोलर स्ट्रीट लाईटिंग करण्यात येणार आहे.

सामंजस्‍य करारासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे पत्रव्यवहार करीत पाठपुरावा केला होता. त्यांचे सहकार्य मिळाले. जिल्ह्यातील ऐतिहासिक, नैसर्गिक आणि अाध्यात्मिक वारसास्थळांचा विकास करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT