Ashok Kharat Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat Scam: भोंदू अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; बनावट खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार उघड

खातेधारकांचा इन्कार; ‘समता’ पतसंस्थेच्या भूमिकेवर संशय, पोलिस तपास अधिक तीव्र

पुढारी वृत्तसेवा

नगर: भोंदू अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. पोलिस तपासात दररोज नवा ट्विस्ट समोर येत आहे. ‌‘समता‌’ पतसंस्थेतून कोट्यवधीचे व्यवहार झालेला खातेधारक नामकर्ण आवारे याची शिर्डी पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत त्याने ‌‘ती‌’ खाती आपली नसल्याचा दावा करतानाच खाते उघडण्यासाठी कधी गेलोच नाही, असा धक्कादायक जबाब पोलिसांना दिला. त्यामुळे आवारेचे खाते उघडतेवेळी अर्जावरील सह्या कोणी केल्या, केवायसी कशी केली गेली, व्यवहार कसे झाले, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‌‘समता‌’चे अध्यक्ष व व्यवस्थापनाची चौकशी होणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून समजले.

शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणात सिन्नरची जगदंबा आणि कोपरगावच्या समता पतसंस्थेची राहाता शाखा चर्चेत आली आहे. दोन्ही संस्थांमध्ये 132 वेगवेगळ्या नावांनी खाती उघडण्यात आली. त्या सर्व खात्यांचा वारसदार अशोक खरातच आहे. याशिवाय त्याचाच मोबाईल नंबर या खात्यांना लिंक आहे. समता पतसंस्थेतून तब्बल 60 कोटींचे व्यवहार करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आल्यानंतर हे व्यवहार पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

पोलिसांनी प्राथमिक तपासात खातेधारकांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्वलिखित पुस्तकात भोंदू खरातची भलामण करणारे नामकर्ण आवरे यांची शिर्डी पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. त्याची सहा खाती समता पतसंस्थेत आहेत. आवारे स्वतः जगदंबा पतसंस्थेचा चेअरमन आहेत.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आवारेंची दोन तास चौकशी केली. या चौकशीत आवारे यांनी सांगितले, की ‌‘समता‌’मध्ये असलेली सहा खाती आणि स्वाक्षरीही माझी नाही. त्यावरील 1 कोटी 20 लाखांचे व्यवहारही मी केलेले नाहीत. मी कधीही संस्थेत खाते उघडण्यासाठी गेलो नाही, असा जबाब त्यांनी सूत्रांकडून सांगण्यात आले. याशिवाय अन्य काही खातेधारकांनीही पोलिसांशी संपर्क साधत ‌‘ते‌’ खाते आमचे नाही, असे सांगितल्याची माहिती पुढे येत आहे. ज्यांच्या नावे खाते आहे ते खातेधारकच आता इन्कार करू लागल्याने गूढ वाढत चालले आहे. पोलिसांनी मात्र त्याच्या मुळाशी जाण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.

शिर्डीतील दोघांच्या कोठडीत वाढ

शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात आरोपी असलेले किरण सोनवणे व अरविंद बावके यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली. या गुन्ह्यात भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातही आरोपी असून ती पसार झाली आहे. अशोक तांबेही गायब आहे.

कोरोनानंतर ‌‘समता‌’च्या ठेवीत 500 कोटींची वाढ

कोरोनापासून गेल्या सहा वर्षांत समता पतसंस्थेत 50 हजार ठेवीदार वाढले आहेत, शिवाय सुमारे 500 कोटींच्या ठेवीही वाढल्या आहेत. पोलिस तपासात काही संशयास्पद खाती समोर आल्याने, आता संस्थेतील सर्वच खात्यांची, ठेवींची, केवायसी आणि त्यातील व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांकडून सहकार खात्याकडे चौकशीची मागणी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

काका कोयटेंच्या चौकशीत समोर येणार सत्य

समता पतसंस्थेतील खाती आमची नसल्याचा दावा खातेधारकांकडून करण्यात येत असल्याने ती नेमकी कोणाची, कोणी उघडली? याचे सत्य उलगडण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ‌‘समता‌’चे संस्थापक-चेअरमन काका कोयटे यांना चौकशीसाठी बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या चौकशीनंतरच, ‌‘त्या‌’ खात्यांची सत्यता समोर येईलच; शिवाय खाते उघडताना अर्जावर केलेल्या सह्या नेमक्या कोणाच्या, केवायसी कशी केली, व्यवहार प्रक्रिया, रोकड काढण्याच्या स्लिपा कोणी भरल्या, अशा अनेक प्रश्नांची उकल होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT