

जामखेड: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या माझी आदर्श शाळा या महत्त्वाकांक्षी उपक्रमात जामखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावत धामणगाव प्राथमिक शाळेची जिल्हास्तरावर निवड झाली.
सरपंच ज्योतीताई महारनवर, उपसरपंच गणेश थोरात तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी शाळेच्या भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने पुढाकार घेतला. उपक्रमांतर्गत शाळेची आकर्षक व सुबक इमारत, स्वच्छ व रंगीत परिसर, विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरण तयार करण्यात आले आहे.
आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन ई-लर्निंग साधनांचा प्रभावी वापर करून अध्यापन अधिक रंजक व समजण्यास सोपे करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत मिशन आरंभ, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. त्याचबरोबर क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्रगतीमागे जामखेड गटविकास अधिकारी शुभम जाधव, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण व अन्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून शाळेला दिशा दिली.
मुख्याध्यापक रुपेश वाणी व सर्व शिक्षकांनी विद्यार्थी गुणवत्ता हेच ध्येय ठेवून सातत्याने परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच शाळेने ही यशस्वी झेप घेतली आहे. परिणामी, धामणगाव शाळेची आदर्श शाळेकडे सुरू असलेली वाटचाल इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ग्रामविकासात शाळेचे महत्व अनोखे
प्राथमिक शाळा नवीन पिढी घडविणारे मंदिर आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेचे रुपडे पालटले. त्यामुळे गावच्या विकासात शाळेला वेगळे महत्व ओळखून सर्वांनी यासाठी काम केले आहे. यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचेमोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सरपंच सरपंच ज्योतीताई महारनवर यांनी सांगितले.