Hanuman Jayanti 2026: संगमनेरात महिलांनी ओढला हनुमानाचा रथ; स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा

हा सोहळा पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती.
Hanuman Jayanti
Hanuman JayantiPudhari
Published on
Updated on

संगमनेर: हनुमान जयंतीनिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार महिलांनी एकत्र येऊन गुरुवारी सकाळी येथे हनुमानाचा रथ ओढला. ‌‘पवनपुत्र हनुमान, प्रभू श्रीरामचंद्र की जय‌’ असा नारा देत मोठ्या संख्येने महिला त्यात सहभागी झाल्या. हा सोहळा पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती.

शहरातील चंद्रशेखर चौकातील मोठे हनुमान मंदिरात दर वर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथील हनुमान रथाची मिरवणूक संपूर्ण शहरातून काढली जाते.

Hanuman Jayanti
Kalpana Kharat Lookout Notice: कल्पना खरातला लुकआऊट नोटीस

गुरुवारी सकाळी 8 वाजता पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी पोलिस स्टेशनपासून हातात भगवा ध्वज घेऊन वाजतगाजत मिरवणुकीने चंद्रशेखर चौकात आणला. सजवलेल्या रथावर ध्वज लावण्यात आला. आ. अमोल खताळ व पोलिस निरीक्षक बारवकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर रथ ओढण्यासाठी महिलांनी गर्दी केली.

नगराध्यक्ष मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ जयश्री थोरात, नीलम खताळ, शोभा परदेशी, नगरसेविका डॉ. अनुराधा सातपुते भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, रेखा गलांडे यांच्यासह शेकडो महिलांनी रथाचा दोर धरून पवनपुत्र हनुमान की जय, जय जय सियारामचा जयघोष करत रथ ओढायला प्रारंभ केला. या सुरुवातीनंतर पुरुषांनी रथ ओढायला सुरुवात केली.

Hanuman Jayanti
Ashok Kharat Case: 62 कोटींचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी भोंदू खरातचा ‌‘समता‌’मार्ग

प्रारंभी महिलांनी रथ ओढल्यानंतर चंद्रशेखर चौकातून रथाची मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी महिलांसह नागरिकांनी पूजा करून हनुमानाचे दर्शन घेतले. रांगोळी, फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी भक्तांसाठी शीतपेय, प्रसादवाटप करण्यात आले. दर्शनासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी गर्दी केली होती. रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका, बाजारपेठ, कुंभार आळा कॉर्नर, तेलीखुंट, नेहरू चौक या मार्गाने मोठ्या मारुती मंदिराजवळ या मिरवणुकीची दुपारी सांगता झाली.

पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, निरीक्षक बारवकर यांनी बंदोबस्त तैनात केला होता. उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, राजाभाऊ देशपांडे, वरद बागूल, चंद्रशेखर हिंदू मंडळाचे अध्यक्ष शुभम लहामगे तसेच महिला शक्ती सदस्य देवयानी जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेला इंग्रजांच्या काळात एका वर्षी मनाई करण्यात आली होती. तेव्हा इंग्रजांचा आदेश झुगारून झुंबरबाई अवसक यांच्यासह पाच-सहा महिलांनी रथ ओढण्यासाठी पुढाकार घेतला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी हा रथ ओढण्याचा मान महिलांना देण्यात येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news