Anti Superstition Movement Pudhari
अहिल्यानगर

Anti Superstition Movement: अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नगरमध्ये बुवाबाजी विरोधी संघर्ष फेरी; राज्यभरातून ३५० पदाधिकारी सहभागी

जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी व पोलिस ठाण्यांत विशेष कक्ष स्थापनेची मागणी; विज्ञानाधारित समाजनिर्मितीचा संकल्प

पुढारी वृत्तसेवा

नगर: जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष करणे अशा मागण्यांसह अंधश्रद्धा दूर करण्याचा आणि भोंदूमुक्त गाव साकारण्याचा संकल्प महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहरात काढण्यात आलेल्या बुवाबाजी विरोधी संघर्ष फेरीद्वारे शनिवारी करण्यात आला.

शहरातील बडी साजन मंगल कार्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेक जागर संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.६) सायंकाळी कोठी रोडमार्गे बाजार समितीपर्यंत आणि बाजार समिती ते जुने बसस्थानक मार्गे बडी साजन मंगल कार्यालयापर्यंत बुवाबाजी विरोधी संघर्ष फेरी काढण्यात आली.

महाराष्ट्र अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव ठकसेन गोराणे, राज्य निमंत्रित कॉ.बाबा आरगडे, राज्य कार्यवाह अॅड. रंजना गवांदे, प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, विनायक सावळे, रूकसाना मुल्ला, विजय परब, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, सुधाकर काशीद, कृष्णात स्वाती, आरती नाईक, उत्तरेश्वर बिराजदार, सुरेश बोरसे, विलास निंबोरकर, मच्छिंद्रनाथ मुंडे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद भारुळे व डॉ.प्रकाश गरुड, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा, सोशल मिडिया कार्यवाह सुखदेव फुलारी, नगर शहराध्यक्ष भारतभूषण भागवत, शहर कार्याध्यक्ष विनायक ताकपेरे, शहर प्रधान सचिव ठकाजी जगधने, सतीश केदार, बी. के. चव्हाण यांच्यासह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३५० हून अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते.

जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी, प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष, अशा मागण्यांसह विज्ञानाची कास धरा, अंधश्रध्दा दूर करा; नातं विज्ञानाशी जोडू, बेडी अंधश्रद्धेची तोडू; प्रत्येक जण प्रयत्न करू, भोंदूमुक्त गाव साकारू; बुवाबाजी, भोंदूगिरी समाजाची ही बिमारी; खात्री होता भोंदूगिरीची, तक्रार नोंदवा बुवाबाजीची; शहाणपणाने विचार करा, भोंदूगिरीला नको थारा; भोंदूंचा नाद सोडा, गुलामगिरीतून बाहेर पडा... अशा विविध घोषणा या फेरीत देण्यात आल्या.

या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लामते यांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे अध्यक्षस्थानी होते. राज्याध्यक्ष माधव बावगे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक डॉ. नितीन शिंदे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT