दीपक ओहोळ
नगर: जिल्ह्यात दुसर्या दिवशीही मंगळवारी (दि.७) पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली. बुधवारी (दि.८) सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी २३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अकोले तालुक्यात सर्वाधिक ५०.५ मिलिमीटर पाऊस झाला. संगमनेर, कोपरगाव, पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतही जोरदार पावसाने हजेरी लावत शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दरम्यान, रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत सरासरी ६२ मिलिमीटर पाऊस झाला. या दमदार पावसाने जिल्ह्यावरील दुष्काळी सावट दूर होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात सोमवारनंतर मंगळवारीदेखील जोरदार पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यावरील ढगफुटीसदृश स्थिती दक्षिण दिशेला सरकली. त्यामुळे अकोले आणि संगमनेर तालुक्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी अकोले तालुक्यात ६१ मिलिमीटर पाऊस झाला. मंगळवारीदेखील पावसाने हजेरी लावत शेतकर्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
मंगळवारी (दि.७) सकाळी १० ते बुधवारी (दि.८) सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे गेल्या २४ तासांत जिल्हाभरात सरासरी २३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या सर्वदूर पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले.
मंगळवारचा पाऊस सर्वच महसूल मंडलांत कमी अधिक प्रमाणात कोसळला आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली.याशिवाय ३१ महसूल मंडलांत ३५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
अकोले तालुक्यात तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा व मुळा धरणांत नवीन आवक वाढली आहे. बुधवारी (दि.८) सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील पाणीसाठा ५४ तर मुळा धरणाचा पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहोचला होता.
आठ दिवसांत ७५.२ मिमी पाऊस
जून महिन्यात सरासरी १०८.२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त ६६. १ मिलिमीटर पावसाने हजेरी लावली. जवळपास ३९ टक्के पावसाची तूट होती. जुलै महिन्यात सरासरी ९७.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांत सरासरी ७५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या सव्वा महिन्यांत सरासरी १३३.४ मिलिमीटर अपेक्षित असताना १४१.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांत झालेल्या पावसाने वातावरण बदलले आहे.
तालुकानिहाय पाऊस
नगर २३.९, पारनेर ३७.३, श्रीगोंदा ३१.३, कर्जत २०.६, जामखेड १२.६, शेवगाव ४.४, पाथर्डी ७.७,नेवासा ८.६, राहुरी १२.८, संगमनेर ३४.२, अकोले ५०.५, कोपरगाव ४१.५, श्रीरामपूर ९.७, राहाता २१.९. (मिलिमीटर)
नद्यांना विसर्ग सुरू असल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून बुधवारी (दि.८) सकाळी ९ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १२ हजार ६२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, सायंकाळी आठ वाजता हा विसर्ग ४८ हजार ५५९ क्यूसेक इतका नोंदविला गेला. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील साहित्य व जनावरे तत्काळ सुरक्षितस्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक येथील कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीपात्रात दौंड पूलातून १ लाख १३ हजार ८७७ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. येडगाव धरणातून कुकडी नदीपात्रात ४ हजार क्यूसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे या तीनही नद्यांकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
‘मुळा’ला संजीवनी; नवी २.७ टीएमसी आवक
गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत व्याकुळ झालेल्या मुळा धरणाला अखेर तीन दिवसांच्या संततधार पावसाने नवसंजीवनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी खपाटीला गेलेल्या धरणात आता नव्या पाण्याची झपाट्याने भर पडत असून अवघ्या तीन दिवसांत २७०० दशलक्ष घनफूट पाणी जमा झाल्याने धरणाचा साठा ९ हजार दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे. त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातील लाखो नागरिक आणि हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी सायंकाळी सहा वाजता धरणाकडे ८३७३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने कोतुळ परिसरातील लहित खुर्द येथून दुपारपर्यंत २६ हजार ५५१ क्युसेक वेगाने पाणी धरणाकडे धावत होते. सायंकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने आवकेत घट झाली, मात्र सलग तीन दिवस पडलेल्या पावसाने धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पावसाची नोंद झाली आहे. खडकी येथे १७० मिमी, विहीर १२३ मिमी, कोतुळ ९२ मिमी, चास ८१ मिमी, डोळासने ५४ मिमी, घारगाव ३८ मिमी, सावरचोळ ३० मिमी आणि मुळानगर येथे १८ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे डोंगरदऱ्यांतील असंख्य ओढे-नाले खळाळून वाहू लागले असून त्यांचे पाणी मुळा धरणात दाखल होत आहे.
नगर महापालिका, राहुरी व देवळाली प्रवरा, सोनई, बारागाव नांदूर, बांबोरी सडे, बुऱ्हाणनगर, कुरणवाडी, सुपे आदी पाणीपुरवठा योजनांसह महात्मा फुले कृषी विद्यापीठ, ब्राह्मणी आणि पांढरीपूल पाणीपुरवठा योजना मुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे धरणातील वाढता प्रत्येक दशलक्ष घनफूट हा लाखो नागरिकांसाठी दिलासादायक ठरतो.