नगर: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील पाणीपुरवठ्याचे सुक्ष्म नियोजन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर भर दिला आहे. मात्र, नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणापासून शहरापर्यंतच्या जलवाहिनीमध्ये कुठेही गळती राहणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. तसेच शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेतील लिकेज शोधून ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. पाणीपुरवठा करताना होणारी गळती आणि अनावश्यक पाणी वापर कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत सध्या कोणताही बदल केला जाणार नाही. नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा केला जाईल; मात्र अनावश्यक वापराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील.
वाशिंग सेंटर, बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरास बंदी
शहरातील वाहन धुण्याच्या केंद्रांमध्ये महापालिकेच्या पाण्याचा वापर होऊ नये, यासाठी वॉशिंग सेंटरची तपासणी करून आवश्यक आदेश दिले जाणार आहेत. उद्याने, रस्ते, बांधकामे तसेच अन्य कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापरावर बंदी केली जाणार आहे. या कामांसाठी बोअरवेलचे, प्रक्रिया केलेले सांडपाण्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
नळांना तोट्या बसविणार
सर्व मालमत्ताधारकांच्या नळ कनेक्शनना सक्तीने तोट्या बसविण्याचे आदेश दिले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या पथकांकडून त्याची तपासणीही केली जाणार आहे. नळ सुरू राहिल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय होते. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणातून गरजेपुरतेच पाणी उचलणार
मुळा धरणातील उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी भविष्यात शहराला आवश्यक तेवढेच पाणी धरणातून उचलण्याचे नियोजन केले जाणार आहे. मागणी आणि उपलब्ध साठा यांचा नियमित आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल.
तीन मीटरने खालावली भूजलपातळी
अल निनो प्रभावामुळे पावसाची मोठी तूट निर्माण होऊन जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी 2.80 मीटरने खालावल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नगर, जामखेड व शेवगाव या तालुक्यांत जवळपास चार मीटरची घट आढळून आली आहे. अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली तरच भूजलपातळीत थोडाफार बदल होईल. अन्यथा पाणीपातळी आणखी खालावत जाऊन पाणीटंचाई अधिकच गंभीर होणार आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक 131 टक्के पाऊस झाला होता. तरीही नगर, संगमनेर, अकोले, पारनेर, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यांत उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन टँकर सुरू झाले. मे महिन्यात भूजल सर्वेक्षण केले असता भूजलपातळी सरासरी एक ते सव्वा मीटरने खालावल्याचे आढळून आले होते. त्यामुळे टँकरची संख्या 162 वर गेली होती. पावसाळ्यात भूजलपातळीत वाढ होते. मात्र, जिल्ह्यात यंदा फक्त 66 टक्केच पावसाची नोंद झाली. दमदार पावसाअभावी छोट्या नद्या,नाले वाहिले गेले नाहीत. त्यामुळे भूजल पातळी काही वाढली नाही.
गेल्या पाच वर्षांतील सप्टेंबर महिन्याची सरासरी भूजलपातळी 2.51 मीटर आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात 202 विहिरींची पाहणी करून अहवाल प्रसिद्ध केला. त्यात जिल्ह्याची सप्टेंबर महिन्यातील भूजलपातळी 5.31 मीटरवर गेल्याचे आढळले. ती यंदा सरासरी 2.80 मीटरने खालावल्याचे स्पष्ट झाले. श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यात किंचित घट आहे. मात्र, उर्वरित तालुक्यांत दोन सव्वादोन मीटरने घटली आहे. दिवसेंदिवस ही घट वाढत जाऊन जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती अधिकच गंभीर होऊन टँकर संख्येत आणि चाराटंचाईत वाढ होणार आहे.
तालुकानिहाय घट
अकोले : 1.92, जामखेड : 4.78, कर्जत : 2.78, कोपरगाव : 0.79, नगर : 4.87, नेवासा : 2.83, पारनेर : 1.98, पाथर्डी : 3.69, राहाता : 2.62, राहुरी : 3.07, संगमनेर : 2.13, शेवगाव : 3.88, श्रीगोंदा : 3.20, श्रीरामपूर : 0.69. (मीटरमध्ये)
शासनाच्या आदेशानुसार दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. परंतु, पाणी दिवसाआडच वितरित करण्यात येईल. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. नळाला तोट्या बसवा, पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहू देऊ नये, अंगण, दुचाकी धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाणी बचतीवर भर द्यावा.यशवंत डांगे, आयुक्त