संगमनेर: पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून आदिवासी महिलेला जातियवाचक शिविगाळ व विनयभंग करून, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना सारोळे पठार येथे घडली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला कुटुंबियांसह सारोळे पठार येथे राहते. शेजारी जैतुन गुलशन अन्सारी राहतात. त्यांची मुलीचा विवाह शिंदोडी येथील अतिक बशीर शेख याच्याशी झाला आहे. ती सध्या आईकडे आली आहे. (दि. 25 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी पाणी भरण्याच्या कारणातून जैतून अन्सारी यांनी, महिलेला शिवीगाळ केली. यानंतर रात्री अन्सारी यांचा, जावई अतीक बशीर शेख तेथे आला. त्याने जातियवाचक शिवीगाळ करुन, त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. याबाबत वारंवार चकरा मारूनसुद्धा घारगाव पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच, पोलिसांनी गुन्हा केला आहे.
याबाबत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते योगेश सूर्यवंशी म्हणाले की, आदिवासी महालेला मारहाण करुन, जातियवाचक शिविगाळ, दमदाटी, विनयभंग होऊनही घारगाव पोलिसांनी साधी तक्रार दाखल करुन घेतली नाही. पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात वारंवार चकरा मारुनही, दखल घेतली नाही, अशी माहिती समजल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात धाव घेतली, मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक गुन्हा दाखल करुन घेत नव्हते. अखेर वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.
घारगाव पोलिस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांतील आरोपींना पोलिस जेरबंद करु शकत नाहीत. पोलिस वसुली करण्यात व्यस्त आहेत, अशा अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अखेर दोन महिलांसह एकाविरुद्ध गुन्हा
याप्रकरणी जैतून गुलशन अन्सारी ( रा. सारोळेपठार,) अतीक बशीर शेख व अलमिरा अतीक शेख (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगाव पोलिस करीत आहेत.