जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे विद्युत तारेला चिकटून बाप-लेकाचा मृत्यू Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed News: जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे विद्युत तारेला चिकटून बाप-लेकाचा मृत्यू

महावितरणच्या गलथान कारभारामुळे घडली दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप- लेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होवून जागेवरच मृत्यू झाला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांन कडून सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शिकारे वस्ती येथील बाळगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब शिकारे वय 42 व त्यांचा मुलगा महेश शिकारे वय 15 वर्षे हे दोघे बाप-लेक उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. मात्र मागिल पंधरा दिवसांपूर्वी खर्डा परीसरात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होऊन अनेक विजेचे पोल पडले होते तर काही ठिकाणी विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. त्या तारांना धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बाळगव्हाण येथील घटना घडलेल्या शेतात देखील विजेच्या तारांचे पोल खाली पडल्यामुळे या विजेच्या तारा उसाच्या शेतात पडल्या होत्या. मात्र याठिकाणी मुलगा खत टाकण्यासाठी गेला तेंव्हा त्याला खाली पडलेल्या तारा न दिसल्याने या तारांना चिकटून त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे वडील काकासाहेब शिकारे हे पाठीमागून शेतात आले व मुलाला चिकटलेले पाहून ते देखील त्याला वाचवण्यासाठी गेले मात्र त्यांनाही या विजेच्या तारांचा झटका बसल्याने त्यांचा झाला. ही घटना काल दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे.

मात्र रात्री उशिरा वडील आणि मुलगा शेतातून घरी आले नसल्याने रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थ हे शेतात त्यांना शोधण्यासाठी गेले. यावेळी त्यांना वडील व मुलाचा विद्युत तारांना चिकटून मृत्यू झाला असल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती समजताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील कारवाई करून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेहावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कारवाई करा

पंधरा ते वीस दिवसापूर्वी वादळी वाऱ्याने बाळगव्हाण परीसरातील वीज मंडळाच्या खांबावरील तारा तुटल्या होत्या, याबाबत येथील नागरिकांनी वीज प्रवाह तुटला असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी तारा जोडून वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे, असे शिकारे वस्ती व बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे या बाप लेकाचा बळी गेल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. तरी संबंधित विद्युत महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने दोषींवर कठोर कारवाई करा- आ रोहित पवार

विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तुटलेल्या या तारा अद्यापही तशाच पडून आहेत आणि त्यामुळंच या बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला. याला पूर्णतः महावितरण जबाबदार आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कधीही भरून न निघणारी हानी लक्षात घेता शिकारे कुटुंबालाही मदत करावी अशी मागणी आ रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT