

जामखेड: तालुक्यातील जमदारवाडी येथे शुक्रवारी (दि. 20) रात्री हॉटेल बिलावरून सुरू झालेला किरकोळ वाद हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेत दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आली असून, त्यापैकी एका भावाच्या गळ्यातील सुमारे 50 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावण्यात आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी अमोल बाजीराव खरात (रा. बीड रोड, जामखेड) यांच्या निसर्ग हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री 10.30 वाजता दीपक दत्तू जगदाळे व अमोल जगदाळे जेवणासाठी आले होते. रात्री 11.40 वा. जेवण झाल्यावर बिलाच्या रकमेमुळे वाद झाला. दीपक याने बिल जास्त लावल्याचा आरोप करत शिवीगाळ व वाद सुरू केला. त्यानंतर अमोल जगदाळेने बाहेर जाऊन काही सहकार्यांना फोन करून बोलावून घेतले. (Latest Ahilyanagar News)
थोड्याच वेळात अजित ऊर्फ दादा शहाजी जगदाळे, राजेंद्र ऊर्फ चाचा राळेभात, गणेश ऊर्फ पप्पू दत्तू जगदाळे, सूरज नामदेव जगदाळे व राहुल रामनाथ जगदाळे हे सर्वजण हॉटेलच्या काउंटरजवळ दाखल झाले. यानंतर दीपक व अजित यांनी अमोल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दीपक याने दगड उचलून अमोलच्या डोक्यावर डाव्या कानाच्या मागे मारून त्याला गंभीर दुखापत केली.
गोंधळ बघून भांडण सोडवायला आलेल्या अमोलच्या भावाला, आनंद खरात यालाही राजेंद्र राळेभात याने लाकडी काठीने मारले. झटापटीत अमोलच्या गळ्यातील सुमारे 50 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तुटून खाली पडली. ती चैन अजित जगदाळे याने उचलून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या झटापटीवेळी हॉटेल समोरील पानटपरी चालक प्रशांत जगताप व अमोलचा पुतण्या ऋषिकेश खरात यांनी हस्तक्षेप करून दोघा भावांना आरोपींच्या तावडीतून सोडवले.
फिर्यादी अमोल खरात यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.