अंध धावपटूला 65 वर्षांच्या नऊवारी साडी नेसलेल्या आजीची साथ, भुईकोट किल्ला मॅरेथॉनमधील हा फोटो का व्हायरल होतोय? Pudhari
अहिल्यानगर

Nagar: अंध धावपटूला 65 वर्षांच्या नऊवारी साडी नेसलेल्या आजीची साथ, भुईकोट किल्ला मॅरेथॉनमधील हा फोटो का व्हायरल होतोय?

या प्रेरणादायी व आदर्श कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

नगर: नऊवारी साडी नेसलेल्या आजी व त्यांच्या मदतीने अंध धावपटूने दहा किलोमीटरची शर्यत पूर्ण करण्याची किमया हिस्टोरिक रन या मॅरेथॉन स्पर्धेत घडली. या 65 वर्षांच्या आजीचे नाव आहे कमलताई बनकर व अंध धावपटूचे नाव आहे अजय धोपावकर. त्यांनी 1 तास 43 मिनिटांत सलगपणे धावत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याच्या या प्रेरणादायी व आदर्श कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भुईकोट किल्ला परिसरात 1 जूनला झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी आजींनी मॅरेथॉनसाठी लागणारा टी-शर्ट व क्रमांक साडीवर परिधान केला होता. त्याच्या डोक्यावरही पदर होता. आजींनी पुढे पळताना धोपावकर यांच्या हातातील दोरीचे पुढचे टोक पकडले होते. धावताना आजी रस्त्यातील खड्डे, गतिरोधक, चढ-उतार यांची माहितीही धोपावकर यांना देत होत्या. अन्य धावपटूही त्यांना मदत करत होते. (Latest Ahilyanagar News)

बनकर आजींनी आतापर्यंत वेगवेगळ्या अंतराच्या 12 मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणार्‍या नगर जिल्ह्यातील त्या एकमेव मॅरेथॉनपटू आहेत. आजींचे कुटुंबही वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असते. त्यांचा मुलगा सुनील, सून सविता, नातू अभय व अमृत बनकर हेही हिस्टोरिक रनमध्ये 10 किलोमीटर धावले.

आजीचा मुलगा सुनील बनकर व रितेश खंडेलवाल हे दोघे दक्षिण आफ्रिकेत 8 जूनला होणार्‍या कॉम्रेड मॅरेथॉनला जात आहेत. ही मॅरेथॉन 89 किलोमीटरची असून त्यांना ती 12 तासांत पूर्ण करायची आहे.दरम्यान, धोपावकर यांनीही आतापर्यंत 17 मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारे देशातील दुसरे व नगर जिल्ह्यातील एकमेव अंध धावपटू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT