

राहुरी: तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला. माज मंत्री प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांनी कारखाना 21-0 ने ताब्यात घेत राजू शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळाचा दारूण पराभव केल्यानंतर तनपुरेंना पाठबळ देत मोठ्या विजयात विखे गटाच्या अदृष्य हाताची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. दरम्यान, नगर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झाली ती विखे विरोधकांच्या वाताहातीची. ज्यांनी विखे कुटुंबियांना लोकसभा निवडणुकीत विरोध केला त्या सर्व विरोधकांना पराभवाची धूळ चारत माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी टायगर अभी जिंदा है ची हुंकार भरली होती. (Latest Ahilyanagar News)
पारनेरमध्ये खा. नीलेश लंके, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, राहुरीत प्राजक्त तनपुरे, श्रीगोंद्यात राहुल जगताप यांचा पराभव केल्यानंतर मा.खा. विखे यांनी विरोधकांना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. तोच इशारा राहुरीच्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीतही ठळकपणे दिसून आला.
डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी कारखान्याची निवडणूक जाहिर होताच भाजपकडून आ. शिवाजी कर्डिले यांनी पॅनलची तयारी सुरू केली होती. परंतू प्रवरेचा आदेश येताच तनपुरे कारखान्याबाबत भाजपची तलवारीची म्यान केली. भाजपने माघार घेतल्यानंतर विखे-कर्डिले समर्थकांमध्ये संम्रभ वाढला.
विधानसभा निवडणुकीत राजू शेटे यांनी साथ दिल्याने आ. कर्डिले समर्थकांनी कारखाना निवडणुकीत शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळासाठी उघडपणे प्रचार केला. शेटे यांच्या विजयासाठी आ. कर्डिले गटाने पाठबळ दिल्यानंतर विखे गट मात्र निवडणुकीपासून अलिप्त दिसला.
परंतू लोकसभेत शेटे यांनी खा. लंके यांना पाठबळ दिल्याचे पाहून विखे समर्थकांनी तनपुरे यांच्या जनसेवेला अप्रत्यक्षरित्या पाठबळ दिल्याची चर्चा सोशल मीडियातून केली जात आहे. विखे यांनी मदत केल्यानेच तनपुरे गटाला मोठा विजय संपादित करता आला असल्याचे सांगितले जात ओह.
त्यामुळे राहुरीच्या तनपुरे कारखान्याची निवडणूक झाली असली तरी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ‘चुण चुण के बदला लेंगे’ या शब्दाची आठवण काढत तनपुरे कारखान्याच्या निकालाला लोकसभेची किनार असल्याचे बोलले जात आहे.