

नगर: गोवंश जनावरांची कत्तल करणे बंदी असतानाही शहरातील झेंडीगेट परिसरात गोमांस विक्री करणार्या इसमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईत 70 हजार रुपये किंमतीचे 350 किलो गोमांस, सुरी, सत्तूर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, शहरातील झेंडीगेट येथे एका पत्र्याचे शेडमध्ये वसीम शेख हा लोकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होईल, अशा पध्दतीने गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करण्याकरिता त्यांची कत्तल करीत असल्याची खबर कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. (Latest Ahilyanagar News)
त्यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व पंचासह संबंधित ठिकाणी जावून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार, पथकाने आंबेडकर चौक, झेंडीगेट येथे छापा टाकून कारवाई केली. त्यात, 70 हजार रुपये किंमतीचे 350 किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे लहान मोठे तुकडे, मांस, लोखंडी सत्तुर, सुरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वसीम बशीर शेख, वय 36 याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रोहिणी दरंदले ह्या करीत आहे.