नगर : जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग आला असून, आतापर्यंत 2 लाख 98 हजार 128 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. सरासरी 43 टक्के पेरा झाला आहे. नेवासा तालुक्यात सर्वाधिक 78.72 टक्के पेरणी झाली आहे. सर्वात कमी 4.55 टक्के पेरणी कोपरगाव तालुक्यात झाली आहे. पेरणी क्षेत्रावर कापूस, सोयाबीन आणि उडदाचा पेरा सर्वाधिक झाला आहे. पेरणी समाधानकारक असली तरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे निम्म्या तालुक्यांत खरीप पेरणीची मशागत रखडली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 52 टक्के पाऊस कमी झाला. त्यामुळे मशागतीला वेळ मिळाला. खरीप पेरणीस प्रारंभ झाला. कृषी विभागाच्या 24 जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 7 लाख 16 हजार 209 हेक्टरपैकी 2 लाख 98 हजार 128 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यामध्ये बाजरी 29 टक्के, मका 43, तूर 43.43, मुग 56, भुईमूग 8.45 टक्के पेरणीचा समावेश आहे.
तालुकानिहाय पेरणी अहवालात कोपरगाव तालुक्यात सर्वात कमी 4.55, संगमनेर तालुक्यात 12.62, अकोले तालुक्यात 15.72, शेवगाव तालुक्यात 25.64 टक्के तर पाथर्डी तालुक्यात 38 टक्के पेरणी झाली. उर्वरित तालुक्यांत सरासरी 45 टक्क्यांच्या आसपास पेरणी झालेली आहे.
जिल्ह्यात कापसाचा 46.61 टक्के म्हणजे 72 हजार 391 हेक्टरवर पेरणी झाली. यामध्ये नेवासा तालुक्यात सर्वाधिक 23 हजार 439, शेवगावात 16 हजार 350 तर राहुरीत 11 हजार 527 हेक्टर पेरणीचा समावेश आहे. सोयाबीनचा पेरा 36 टक्के म्हणजे 63 हजार 637 हेक्टरवर झाला. सर्वाधिक 18 हजार 373 हेक्टर जामखेड तालुक्यात, 11 हजार 890 राहाता तर 9 हजार 436 हेक्टर पारनेर तालुक्यातील पेरणीचा समावेश आहे.
नगर : 7795 (16), पारनेर : 42,871 (67), श्रीगोंदा :15,066 (47), कर्जत : 37,555 (50), जामखेड : 45,706 (69), शेवगाव : 18,816 (26), पाथर्डी : 27, 787 (38), नेवासा : 38,839 (79), राहुरी : 16,577 (51), संगमनेर : 7207 (13), अकोले : 6951 (16), कोपरगाव : 1573 (5), श्रीरामपूर :12,986 (44), राहाता : 18,339 (53).