नगर: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या तब्बल तीन वर्षांनंतर अखेर बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. काल शेवटच्या टप्प्यात संवर्ग चारमधील 3095 शिक्षकांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नवीन शाळेत बदल्या मिळाल्या. दरम्यान, अनेक शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळाल्याने या बदली प्रक्रियेतून ‘बहुत खुशी, थोडासा गम’ असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या यापूर्वी 2022 मध्ये बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर लोकसभा, विधानसभा आचारसंहितामुळे तसेच इतर कारणांनी पुन्हा बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे 2025 च्या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. (Latest Ahilyanagar News)
संवर्ग एकमध्ये 863 शिक्षकांच्या पहिल्या टप्प्यात बदल्या झाल्या होत्या. संवर्ग दोनमध्ये 374, संवर्ग तीनमध्ये तीनशे शिक्षक अवघड क्षेत्रातून बाहेर निघाले, त्यानंतर सर्वांच्या नजरा संवर्ग चारमधील प्रशासकीय बदल्यांकडे लागले होते. या बदल्यांसाठी पाच वर्षे एकाच शाळेवर, तसेच दहा वर्षे एकाच क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना पात्र ठरवले होते.
3240 शिक्षक प्रशासकीय बदल्यांसाठी पात्र होते. या शिक्षकांनी बदल्यांंचे ऑनलाइन फॉर्म भरले होते. त्यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या 30 शाळांचा पर्याय निवडण्यात आला होता. काल, दि. 14 रोजी सायंकाळी 3095 शिक्षकांच्या बदल्यांची यादी ऑनलाईन पोर्टलवर जाहीर झाली. संबंधित शिक्षकांना आता नव्या शाळा मिळाल्या आहेत. लवकरच सध्या आहे त्या शाळेवरून बदलीच्या ठिकाणी हजर होण्याबाबत शिक्षण विभागाकडून संबंधितांना सूचना करण्यात येणार आहेत.
दरम्यान बदल्यांमध्ये काहींना सोयीच्या शाळा मिळाल्या तर काहींची गैरसोय झाल्याचे दिसले आहे. त्यामुळे या बदल्यांबाबत संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसल्या. 145 शिक्षक प्रतीक्षा यादीत असून त्यांचा दुसरा टप्पा लवकरच होणार आहे. त्यामुळे त्यांनाही नव्या शाळा मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली.
बदल्यांची ही वेळ योग्य?
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पहिली चाचणी तोंडावर आहे. अशा वेळी शिक्षकांना बदल्या देण्यात आल्या. त्यामुळे ते ज्या शाळेतून जातील आणि ज्या शाळेवर जातील, तेथील विद्यार्थ्यांना जुळवून घेणे कठीण होणार आहे, यातून शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुकानिहाय बदल्या
संगमनेर 287, राहुरी 267, राहाता 191, पाथर्डी 217, श्रीरामपूर 160, श्रीगोंदा 396, शेवगाव 231, पारनेर 227, नेवासा 353, नगर 137, कोपरगाव 167