श्रीगोंदा: येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेतील पोषण आहारातील तांदळाच्या साठ्याचा तपशील आणि प्रत्यक्ष साठा यात तब्बल 2 हजार 385 किलोंची तफावत आढळून आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची भंडाफोड केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेत पोषण आहारात अनियमितता असल्याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी पंचायत समितीला निवेदन दिले होते. सोमवारी (दि. 30) त्यांनी पोषण आहार अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्यासह शाळेत जाऊन नोंदवही व प्रत्यक्ष साठा तपासला. (Latest Ahilyanagar News)
त्या वेळी 28 जूनपर्यंत 4 हजार 385 किलो तांदूळ शिल्लक असल्याची नोंद होती. प्रत्यक्षात तांदूळ मोजला असता तो सुमारे 2 टन किलोच आढळून आला. नोंदवहीपेक्षा सव्वादोन टनाहून अधिक तांदूळ कमी असल्याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
दरम्यान, विद्यार्थ्यांमधील कुपोषण टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना सकस आहार मिळण्यासाठी शालेय पोषण आहाराची योजना राबवली जाते. मात्र, या योजनेत वेगवेगळ्या स्तरावरून ‘गफला’ होत असल्याची चर्चा अनेकदा समोर येते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
तांदूळ कमी तर आढळला आहेच; शिवाय जो शिल्लक होता तोही अस्वच्छ होता. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून मुख्याध्यापकांसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे.-अरविंद कापसे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
‘रेकॉर्ड’पेक्षा जवळपास सव्वादोन टन तांदूळ कमी आढळून आला आहे. याबाबत मुख्याध्यापकांकडून खुलासा मागविणार आहोत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.-सत्यजित मच्छिंद्र, अधीक्षक, पोषण आहार