नगर: लाल टाकी परिसरातील जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या गुरुकुल इमारतीतील 19 गाळेधारकांना भाडे थकविल्याप्रकरणी विकास मंडळाने दाखल केलेल्या दाव्या नुसार पुणे धर्मदाय आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. 25 जुलै रोजी याबाबत अंतिम सुनावणी होणार असून यावेळी हजर राहण्याचे आदेश कार्यालयाने काढले आहेत.
याबाबतची संपूर्ण माहिती अशी की, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मालकीच्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ या संस्थेची लाल टाकी परिसरात गुरुकुल नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण 27 भाडेकरू आहेत, त्यापैकी 19 भाडेकरूंनी गेल्या अनेक वर्षाचे गाळ्यांचे भाडे थकविले आहे तसेच भाडेकराराचे दर तीन वर्षांनी करावयाचे नूतनीकरण देखील केलेले नाही. (Latest Ahilyanagar News)
या संदर्भात विद्यमान विश्वस्त मंडळाने या भाडेकरूशी वेळोवेळी संपर्क साधून नियमानुसार भाडेकराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात आवाहन केले होते. मात्र त्याला 19 जणांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेवटी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांनी धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे दावा दाखल केला. त्यानुसार या सर्वांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून त्याची सुनावणी 25 तारखेला होणार आहे.
चाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विकास मंडळाची गुरुकुल नावाची इमारत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वर्गणीतून उभी राहिली आहे. त्या ठिकाणी जे गाळेधारक भाडेकरू टाकलेले आहेत, त्यांनी वेळोवेळी भाडे कराराचे नुतनीकरण करणे आवश्यक होते तसेच नियमानुसार भाडेवाढ करणे देखील अपेक्षित होते.
मात्र शिक्षकांच्या राजकारणात मागील विश्वस्त मंडळांनी या बाबींकडे दुर्लक्ष केले. यातील बहुतेक भाडेकरूंनी पोट भाडेकरू टाकले असून ते परस्पर भाडे वसूल करतात. मात्र विकास मंडळाचे नुकसान करतात. या संदर्भात विद्यमान विश्वस्त मंडळाने प्रथमतः त्यांच्याशी संपर्क करून त्यांना विनंती केली, नंतर वकिलामार्फत नोटीस दिली. त्यालाही फारशी दाद न दिल्याने अखेर विश्वस्त मंडळाने धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला आहे.
नगर शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीचे गाळेधारकांचे भाडे अत्यंत अल्प असून ते सुद्धा वेळेत आदा होत नसल्याने विकास मंडळ तोट्यात चालले आहे. परिणामी शिक्षकांच्या विकासाच्या संदर्भात कोणतेही काम करणे शक्य झालेले नाही. जुन्या भाडेकरूंना शिक्षकांच्या राजकारणातील काही नेत्यांचे अभय असल्याने ते भाडेकरार करण्यास टाळत असल्याची माहिती सचिव संतोष आंबेकर यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासूनचा रखडलेला भाडेकरारचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालना दिल्याबद्दल जिल्ह्यातील सभासदांकडून अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, सचिव संतोष आंबेकर, उपाध्यक्ष दिलीप गंभीरे, खजिनदार सुवर्णा राठोड, माजी अध्यक्ष विलास गवळी, प्रदीप दळवी, माजी उपाध्यक्ष नवनाथ दिवटे, संजय शेंडगे, माजी सचिव संतोष मगर, विश्वस्त राजेंद्र निमसे मुकुंदराज सातपुते, गणेश गायकवाड, चांगदेव काकडे, बाळासाहेब गमे, दत्तात्रय फुंदे, मनीषा गाढवे (शिंदे),अनिता उगले (नेहे)उर्मिला राऊत, स्वीकृत विश्वस्त सलीमखान पठाण, व्यवस्थापक सुरेंद्र आढाव यांचे अभिनंदन केले आहे.
सर्व गाळे रिकामे करून नवा करार करा!
विकास मंडळाची वार्षिक सभा लवकरच होणार आहे. या सभेत या इमारतीतील सर्व गाळे रिकामे करून नवीन करार करून लिलाव पद्धतीने भाडे करार करून भाडेकरू टाकण्यात यावेत, अशी मागणी जिल्ह्यातील विकास मंडळाच्या सभासदांनी केली आहे.