उत्तर महाराष्ट्र

जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन

गणेश सोनवणे

जळगाव : आशा व गट प्रवर्तक स्वयंसेविका यांचे सहा महिन्यांपासून थकीत मोबदला, मानधन व वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

जळगाव महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी कोरोना संकटात आपले व कुटुंबाचे प्राण धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची अहोरात्र सेवा केली. असे असतानाही आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविका यांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मोबदला, वाढीव मोबदला तसेच प्रोत्साहन भत्ता आणि सर्व देयके मिळालेले नाहीत. महानगरपालिकेच्या या कारभारामुळे आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविका यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.

राज्य व केंद्र सरकार यांनी थकित मानधन, मोबदला व प्रोत्साहन भत्ता अशी देयके अदा करण्याचे आदेश असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने थकीत मानधन मोबदला प्रोत्साहन भत्ता व सहा महिन्यांपासून थकीत असलेले देयके त्वरित बँक खात्यात वर्ग करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले आहे. जोपर्यंत थकीत मोबदला व मानधन मिळत नाही, तोपर्यंत दैनंदिन कामबंद राहण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT